उदगीरीचा मुलुख साहित्यप्रेमींच्या प्रतिक्षेत! संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात

बालाजी सुवर्णकार |सह्याद्री चौफेर 

उदगीर : अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी केवळ मराठवाडा, महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा सीमाप्रांतही सज्ज झाला आहे. भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी म्हणून उदगीरच्या चौका चौकात कमानी सुशोभित करण्यात आल्या असून एकूण तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

ऐन एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात साहित्याचा थंडगार शिडकावा करणा-या या सम्मेलनाची धुरा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाने आपल्या हिरकमहोत्सवी वर्षानिमित्त पेलली आहे. महाविद्यालयाच्या एकूण 36 एकरच्या परिसरात व्यासपीठांसाह विविध दालने सुसज्ज करण्यात येत आहेत. त्यात आजवर झालेल्या 94 साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या छायाचित्रांचे तसेच नियोजित अध्यक्ष यांचे दालन हे वैशिष्ट्य आहे. याशिवाय भव्य मुख्य मंडपाला छत्रपती शाहू महाराज सभागृह असे नाव देण्यात आले आहे. तसेच येथील व्यासपीठाला उदयगिरी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. ना. य. डोळे व्यासपीठ म्हणून संबोधण्यात येणार आहे.

परिसंवादाचे दालन लोकनेते विलासराव देशमुख सभागृह म्हणून मिरवणार आहे. याशिवाय शांता शेळके कविकट्टा हा देवीसिंह चौहान सभागृहात तर सुरेश भट गझलकट्टा हा सिकंदर अली वज्द सभागृहात रंगणार आहे. याशिवाय ग्रंथ प्रकाशनाची तीन स्वतंत्र दालने, चित्र-शिल्प कलादालन, अभिजात मराठी दालन, बालमेळाव्याचे स्वतंत्र दालन अशा कित्येक दालनांच्या तयारीने वेग घेतला आहे.
उदगीर नगरीतल्या या साहित्यनगरीचे प्रवेशद्वार उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीने स्वागताला सुसज्ज होत आहे. 
एखाद्या लग्नसोहळ्याला घरातील प्रत्येकाचा हातभार लागावा त्याप्रमाणे अगदी छोट्यातल्या छोट्या कर्मचा-यापासून मंत्र्यांच्या प्रत्यक्ष पाहणी दौ-यापर्यंतची लगबग येथे सुरू झाली आहे.

एकीकडे महाविद्यालयातील प्रवेशासाठी गर्दी करणारे विद्यार्थी त्याचवेळी संमेलनाच्या आयोजनासाठी राबणारी मंडळी अशा गोंगाटात पांढ-या स्वच्छ पडद्यांचे भलेमोठे सभागृह साहित्य सहवासासाठी आसुसले आहे. 
ग्रंथदिंडीचे वेगळेपण साहित्य संमेलनाची सुरूवात ग्रंथदिंडीने करण्याचा प्रघात आहे. यंदाची ग्रंथदिंडी तीन वैशिष्ट्यांच्या पालखीतून मिरवणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या सीमांना एकसंध करणारी ही ग्रंथदिंडी महिलांच्या नेतृत्वातील वाहन पथकाने नेतृत्व करणार आहे. यात 11 महिला बुलेटधारी असून स्कूटी पथकासोबतच घोडेस्वारी पथकातही महिलांचेच वर्चस्व राहणार आहे.

ग्रंथदिंडीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे 'गुगलविधी' होय. कर्नाटकातील गुगल नृत्यप्रकारानुसार विवाहापूर्वी वाजत गाजत, नृत्य करत देवतेची पूजा करण्याचा हा विधी या ग्रंथदिंडीत अनुभवायला मिळणार आहे.
मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी नवरंगदिंडी हे यावेळच्या ग्रंथदिंडीचे तिसरे वैशिष्ट्य. यात 500 शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत. याशिवाय ढोल, लेझीमसह वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे 150 कलावंतही ग्रंथदिंडी संमेलनाच्या उद्घाटनाला तयार रहाणार आहे.
शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा : ना. संजय बनसोडे 
साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी, यशस्वीतेसाठी गेल्या तीन महिन्यापासून अनेक हात अहोरात्र झटत आहेत.

 नियोजन अंतिम टप्प्यात आले असून रासिकांनी संमेलनाला उपस्थित राहून शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. संजय बनसोडे ,. कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष प्रा.मनोहर पटवारी ,प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर.तांबोळी उपप्राचार्य डॉ.आर के मस्के यांनी केले आहे.
उदगीरीचा मुलुख साहित्यप्रेमींच्या प्रतिक्षेत! संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात उदगीरीचा मुलुख साहित्यप्रेमींच्या प्रतिक्षेत! संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात Reviewed by सह्याद्री चौफेर on April 20, 2022 Rating: 5
Powered by Blogger.