कोळसा वाहतुकीमुळे प्रदूषणात झाली मोठी वाढ, रस्त्यांवरही निर्माण झाले खड्डे, ब्लास्टिंगमुळे घरांना पडले तडे तर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शेतात साचू लागले तळे
सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
कोळसाखाणींमुळे वायू प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोळसाखाणींमधून होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण निर्माण झाले आहे. कोळसाखाणींकडे जाणाऱ्या मार्गांवर नेहमी काळ धुकं पसरलेलं असतं. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर पडणाऱ्या कोळशाची भुकटी तयार होऊन ती धूळ बनून सतत उडत असते. या धुळीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोळशाच्या उडणाऱ्या काळ्या धुळीमुळे येथील जनतेचं जीवनचं काळवंडलं आहे. प्रदूषणाचा दर शंभरी पार झाला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे शासन व प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. राहुटी वस्त्यांलगत वणी येथे दोन रेल्वे साइडिंग आहे. या कोळशाच्या साईडिंगवर शेकडो ट्रक दररोज कोळशाची वाहतूक करित असतात. मालवाहू रेल्वेमध्ये कोळसा भरतांना परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असते. कोळशावर व रस्त्यांवर मुबलक पाणी मारण्याची व्यवस्थापकांकडून जराही तसदी घेतली जात नाही. वणी व राजूर येथे रहिवासी वस्त्यांजवळ कोळशाचे मालधक्के असून हे मालधक्के रहिवासी वस्त्यांपासून दूर नेण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. पण काळ्या कोळशात हात रंगलेल्यांनी या मागण्यांकडे दुर्लक्ष करित नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरु ठेवला आहे. या कोळशाच्या धुळीमुळे नागरिकांचे जीवनमान खालावले असून त्यांना अनेक जीवघेणे आजार जडले आहेत. प्रदूषण नियंत्रणाकडे दुर्लक्ष होत असल्याने या कोळसाखाणी आता नागरिकांसाठी शाप ठरू लागल्या आहे.
कोळशाच्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उकणी कोळसाखाणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. घोन्सा गावाकडे जाणारा रस्ताही खड्यांनी व्यापला आहे. राजूर फाट्यापासून भांदेवाडाकडे जाणाऱ्या रस्त्याचीही अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. प्रमुख रहदारीचे रस्ते असलेल्या या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. या रस्त्यांवरून वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. काही कोळसाखाणींमधून सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. काळ्या कोळशाची काळी माया, कशी जाऊ द्यायची वाया, कोण जाईल या जनतेला सांगाया, अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. कुणीही या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. कोळसाखाणींमध्ये होणाऱ्या ब्लास्टिंमुळे घरांना तडे पडले आहेत, दगड ढेले उसळून शेतात पडत आहेत, कोळशाच्या धुळीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे, ब्लास्टिंसाठी वापणाऱ्या बारुदच्या वासामुळे श्वास घेणे कठीण झाले आहे, कोळसाखाणींमध्ये उत्खनन करून मातीचे गावाभोवती ढिगारे तयार करण्यात आल्याने गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे भुस्खननाची भितीही निर्माण झाली आहे. मातीच्या मोठमोठ्या ढिगाऱ्यांमुळे नदीनाल्यांचा प्रवाह बदलला आहे. नाल्यांचे पाणी शेतात शिरून पिकांची हानी होऊ लागली आहे. परंतु शहर प्रशासन व वेकोलि प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलिच्या कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या या सर्व समस्या शासन व प्रशासनापर्यंत पोहोचविल्या जात असतांनाही यावर समाधानकारक तोडगा निघत नाही. वेकोलिने नागरिकांच्या आरोग्याशी व जीविताशी खेळ चालविला असून कोळसाखाणींमुळे निर्माण झालेल्या या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अनिल साळवे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तर सामाजिक कार्यकर्ते प्रदिप बांदूरकर यांनी वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
कोळसा वाहतुकीमुळे प्रदूषणात झाली मोठी वाढ, रस्त्यांवरही निर्माण झाले खड्डे, ब्लास्टिंगमुळे घरांना पडले तडे तर मातीच्या ढिगाऱ्यांमुळे शेतात साचू लागले तळे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 03, 2022
Rating:
