आयजीच्या पथकाची अवैध धंद्यावर झाली धाड आणि यवतमाळ एसपीनी रोखली १९ पोलिस कर्मचाऱ्यांची पगारवाढ, ४ पोलिस कर्मचाऱ्यांना केले निलंबित

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : अमरावती परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक यांच्या विशेष पोलिस पथकाने वणी येथे सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर धाडी टाकून येथील पोलिस दलात खळबळ उडवुन दिली. चार अवैध मटका अड्डे व दोन सुगंधित तंबाखू विक्रेत्यांच्या घर, गोदाम व दुकानांवर धाडी टाकून लाखो रुपयांच्या मुद्देमालासह ४३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या धाडसत्रात चार मटका अड्यांवरून ४ लाख ५७ हजार १७० रुपयांचा तर दोन पान मटेरियल विक्रेत्यांच्या घर, दुकानातून ४ लाख ६३ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तब्बल ४६ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.

आयजी पोलिस पथकाच्या या धाडसत्राचे जिल्हा पोलिस विभागात तीव्र पडसाद उमटले असून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी या कार्यवाहीची दखल घेत वणी पोलिस स्टेशन येथे वणी व पांढरकवडा उप विभागाच्या आठ ठाणेदारांची तत्काळ बैठक बोलावली. त्यानंतर लगेच जिल्ह्यातील शोध पथकं बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर केला. आणी आता पोलिसांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवत शहरातील चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. तर १९ पोलिसांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. शहरात चोरून लपून सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत शहर पोलिस अनभिज्ञ राहिल्याने अमरावती विशेष पोलिस पथकाने येथे येऊन कार्यवाही केली. या धडक कार्यवाहीमुळे नामुष्की ओढवल्या गेल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांवर निलंबनाची कार्यवाही केली.

शहरात अवैध धंदे सुरु असण्याला येथील पोलिस कर्मचाऱ्यांना जबाबदार धरून चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यातील एक कर्मचारी तर ऑन ड्युटी आरोपीला पकडतांना खाली पडून पायाचे हाड मोडल्याने मागील काही दिवसांपासून उपचार घेत आहे. त्याला व्यवस्थित चालताही येत नाही. त्याच्यावरही निलंबनाची कार्यवाही करण्यात आली. आयजीच्या पथकाने टाकलेल्या धाडीने अवैध व्यवसायिक तर जिल्हा पोलिस अधिक्षकांनी केलेल्या कार्यवाहीने पोलिस कर्मचारी चांगलेच धास्तीत आले आहेत.

अमरावती विशेष पोलिस पथकाने परिविक्षाधीन आयपीएस गोवर हसन यांच्या नेतृत्वात २९ जानेवारीला शहरातील चार मटका अड्ड्यांवर एकाच वेळी धाडी टाकल्या होत्या. तसेच प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्या दोन अवैध विक्रेत्यांवरही या पथकाने धाडी टाकल्या. या धाडसत्रामुळे तालुक्यासह जिल्हा पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. या कार्यवाहीची जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दखल घेऊन वणी पोलिस स्टेशनचे चार पोलिस कर्मचारी निलंबित केले. तर १९ पोलिसांची ३ वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे वणी पोलिस पथकातील कर्मचारी चांगलेच हादरले आहेत.

निलंबित केलेल्या पोलीसांमध्ये डीबी पथकाचे एएसआय सुदर्शन वानोळे, ना.पो.का. अशोक टेकाळे, ना.पो.का. पंकज उंबरकर, व एसडीपीओ पथकाचे ना.पो.का. इकबाल शेख यांचा समावेश आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून गुरुवारी रात्री उशिरा वणी पोलिस स्टेशनला ही नोटीस मिळाली.
आयजीच्या पथकाची अवैध धंद्यावर झाली धाड आणि यवतमाळ एसपीनी रोखली १९ पोलिस कर्मचाऱ्यांची पगारवाढ, ४ पोलिस कर्मचाऱ्यांना केले निलंबित आयजीच्या पथकाची अवैध धंद्यावर झाली धाड आणि यवतमाळ एसपीनी रोखली १९ पोलिस कर्मचाऱ्यांची पगारवाढ, ४ पोलिस कर्मचाऱ्यांना केले निलंबित Reviewed by सह्याद्री चौफेर on February 05, 2022 Rating: 5
Powered by Blogger.