कोळसा व्यावसायाशी संबंधित व्यावसायिकांना दिल्या ठाणेदारांनी महत्वाच्या सूचना

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : तालुक्यातील कोळसाखाणी व कोळशावर आधारित उद्योगांमुळे प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून मागील काही महिन्यात वणी तालुक्याने प्रदूषणाची पातळी गाठली आहे. कोळसाखाणीतून उडणाऱ्या काळ्या धुळामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली असून कोळसाखाणीतून होणाऱ्या कोळशाच्या वाहतुकीमुळेही प्रदूषणात भर पडली आहे. कोळसाखाणींमधून रेल्वे साईडींग व विद्युत प्रकल्पांमध्ये मालवाहू वाहनांनी सतत कोळशाची वाहतूक सुरु असते. कोळशाची वाहतूक होणाऱ्या प्रत्येक मार्गांवर धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसते. कोळसा भरलेल्या ट्रकांमधून उडणारा कोळशाचा धूळ व ट्रकांच्या सततच्या जाण्यायेण्याने रस्त्यावरून उडणारा धूळ यामुळे हवेतील प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात असंख्य कोलडेपो थाटले गेले आहेत. या कोलडेपो मधूनही मोठ्या प्रमाणात कोळशाची उलाढाल होत असते. कोळसाखाणींमधून कोलडेपो मध्ये येणाऱ्या व कोलडेपो मधून इतरत्र कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकांची मोठी रेलचेल रहात असल्याने या परिसरात नेहमी काळी धूळ पसरलेली असते. कोलडेपो मधूनही कोळशाची छाननी करतांना व ट्रकांमध्ये कोळसा भरतांना मोठ्या प्रमाणात काळा धूळ उडत असल्याने हा परिसर नेहमी काळवंडलेला दिसून येतो. कोळसा व्यावसायिक, कोलडेपो धारक व कोळसा वाहतूकदार कोळशाशी संबंधित व्यवसाय करतांना कुठलीही दक्षता घेत नसल्याने कोळसा उद्योगामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोळशाच्या नेहमी उडणाऱ्या धुळीमुळे येथील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले आहे. कोळशाशी संबंधित व्यवसाय करतांना त्यापासून प्रदूषणात वाढ होणार नाही, याचं कोळसा व्यवसायिकांना भान राहावं म्हणून ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी कोळशाशी संबंधित सर्व व्यवसायिकांची आज पोलिस स्टेशनमध्ये बैठक घेत त्यांची चांगलीच कान उघडणी केली. कोळशाशी संबंधित व्यवसायिकांनी नियमांचे पालन करून व्यवसाय करावा, तसेच वायू प्रदूषणात वाढ होणार नाही, याची सर्वतः काळजी घेण्याची तंबी देखील ठाणेदारांनी व्यावसायिकांना दिली. 

वणी तालुक्यात अनेक भूमिगत व खुल्या कोळसाखाणी आहेत. या कोळसाखाणींमधून रेल्वे साईडींग, कोल वॉशरी, कोलडेपो व विद्युत प्रकल्पांमध्ये मालवाहू वाहनांनी कोळशाची वाहतूक केली जाते. असंख्य मालवाहू वाहने दिवसरात्र कोळसाखाणींमधून कोळशाची वाहतूक करित असतात. वाहनाच्या जास्तीतजास्त चकरा लागाव्या म्हणून वाहन चालकांकडून सुसाट वाहने चालविली जातात. कोळसा भरलेल्या ट्रकांवर ताडपत्रीही व्यवस्थित बांधली जात नाही. कोळशाची वाहतूक करणाऱ्या काही ट्रकांचे कागदपत्रेही अवैद्य आहेत. कागदपत्रांची मुदत संपल्यानंतरही हातचलाखीने कागदपत्रांच्या तारखा वाढवून कोळसाखाणी, विद्युत प्रकल्प व सिमेंट कंपन्यांमध्ये काही वाहतूकदार वाहनांना वाहतुकीची परवानगी प्राप्त करून घेतात. कोळसाखाणीतील कर्मचाऱ्यांशी संगनमत करून काही वाहनधारक व वाहन चालक ट्रकांमध्ये चोरीचा कोळसा आणतात. तो चोरीचा कोळसा मोठ्या प्रमाणात कोलडेपो मध्ये खाली केला जातो. आता कोळसाखाणींमधून कोळशाची वाहतूक वाढल्याने कोळसा चोरीचे प्रकार वाढू शकतात. तेंव्हा कोलडेपो धारकांनी व कोळसा व्यावसायिकांनी असा चोरीचा कोळसा खरेदी न करता कोलमाफियांची पोलिसांत तक्रार करावी. अनियमित कोणतेही प्रकार घडणार नाही, याची कोळसा व्यवसायाशी संबंधित सर्वांनीच काळजी घ्यावी, असे बाळकडूही यावेळी ठाणेदारांनी सर्व कोळसा व्यावसायिकांना पाजले. कोळसा व्यवसाय व कोळसा वाहतुकीमुळे कोळशाची धूळ उडून वायू प्रदूषण वाढणार नाही, याची दक्षता देखील कोळशाशी संबंधित व्यावसायिकांनी घ्यायची असल्याचे ठाणेदारांनी बजावले. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांची कागदपत्रे, चालकाचा वाहन चालविण्याचा परवाना, वाहन चालक वाहन चालवितांना मद्यपान करणार नाही, चालक सुसाट वाहन चालविणार नाही, रस्त्यावरून वळण घेतांना चालकाने योग्य ती काळजी घ्यावी ही सर्व जबाबदारी कोळसा वाहतूकदार कंपनी व ट्रक मालकांची राहणार असल्याचेही ठाणेदारांनी स्पष्ट केले आहे.

ठाणेदारांच्या या कान उघडणीनंतर कोळशाशी संबंधित व्यावसायिकांमध्ये चांगलीच कुजबुज पाहायला मिळाली.
कोळसा व्यावसायाशी संबंधित व्यावसायिकांना दिल्या ठाणेदारांनी महत्वाच्या सूचना कोळसा व्यावसायाशी संबंधित व्यावसायिकांना दिल्या ठाणेदारांनी महत्वाच्या सूचना Reviewed by सह्याद्री चौफेर on January 08, 2022 Rating: 5
Powered by Blogger.