सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी पासून जवळच निळापूर गावालगत असलेल्या कोल वॉशरी मधून खाजगी विद्युत प्रकल्पांना पाठविण्यात येणाऱ्या कोळशाची रेल्वे सायडिंगवर होणारी कोळसा वाहतूक आता रोषाचे कारण बनू लागली आहे. कोल वॉशरी मधून रेल्वे सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणारे ट्रक निर्धारित वजन क्षमतेपेक्षा अति जास्त कोळसा भरून आणत असल्याने रस्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. निळापूर व कावडी गोवारी कडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याने मार्गक्रमण करणेच कठीण झाले आहे. या मार्गाने दुचाकींचा प्रवास तर अतिशय जिकरीचा झाला आहे. ट्रकांमध्ये पहाडाप्रमाणे कोळसा भरून आणला जात असल्याने तो रस्त्याने सांडत येतो, त्यामुळे या मार्गाने नेहमी अपघाताची शक्यता बळावलेली असते. ट्रकांमधील कोळसा दुचाकीस्वारांच्या अंगावर पडून अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रस्त्यावर पडून राहत असलेल्या कोळशामुळेही रात्रीच्या वेळेला दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत. रस्त्यावर पडलेल्या कोळसावरून वाहने जाणे येणे करत असल्याने त्या कोळशाची भुकटी तयार होऊन त्याचे काळ्या धुळीत रूपांतर होते. टोलनाक्या पासून तर ब्राह्मणी फाट्यापर्यंत व उकणी कडे जाणाऱ्या मार्गावर या काळ्या भुकटीचे अक्षरशः थर जमा झाले आहेत. भरधाव वाहनांच्या जाण्यायेण्याने ती भुकटी उडत असल्याने या मार्गावर नेहमी काळ धुकं पसरलेलं असतं. त्यामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतांना दिसत आहे. याकडे वाहतूक विभाग व संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे आरोग्य व जिव दोनही टांगणीला लागले आहे. ट्रकांमध्ये पहाडाप्रमाणे कोळसा भरला जात असल्याने ताडपत्रीही योग्यरीत्या बांधने कठीण होऊन बसते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कोळसा सांडत येतो. लोव्हरलोड वाहतुकीमुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेता ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखेतर्फे करण्यात आली आहे. आरटीओ व वाहतूक विभागाला ओव्हर लोड ट्रक दिसत नसतील तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून ओव्हरलोड ट्रकांवर कार्यवाही करण्यास मदत करेल, असा इशाराही तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरटीओ कार्यालयाला पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निळापूर येथील महामिनरल अँड बेनिफिकेशन प्रा.ली. या कोल वॉशरी मधून रेल्वे सायडींवर कोळशाची वाहतूक करण्याचे कंत्राट एम ए आर एल या कंपनीला देण्यात आले आहे. तेलंगणा पासिंगचे हे ट्रक मागील कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात अंतर्गत वाहतूक करीत आहे. त्यांनी महाराष्ट्रात अंतर्गत वाहतुकीकरिता घेतलेली परवानगी मासिक आहे की वार्षिक, याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे.
कोळशाची सुरक्षित वाहतूक केली जात नसल्याने रस्ते, पर्यावरण व मानवाच्या जिवीतालाही धोका निर्माण झाला आहे. कोल वॉशरी व काही कोळसा खादाणींमधूनही निर्धारित वजन क्षमतेपेक्षा जास्त कोळसा ट्रकांमध्ये भरून आणला जात आहे. वणी पासून ४० किमी अंतरावर असलेल्या एका कोळसा खदाणीतून कोल वॉशरीमध्ये ओव्हरलोड कोळशाची वाहतूक सुरु असल्याची माहिती आहे. नियमांना डावलून कोळसा खदानींमधून सुरू असलेली ओव्हरलोड वाहतूक एकप्रकारे आव्हान ठरू लागली आहे. काही कोळसा खदाण व्यवस्थापकांनी कोळसा वाहतूकदारांचे लाड पुरविण्याकरिता गभाड सुरु केले आहे. कागदपत्रांची मुद्दत संपलेले ट्रकही कोळसा वाहतूक करतांना दिसत आहे. काही वाहतूकदार ट्रकच्या कागदपत्रांची स्कॅनिंग करून तारखा वाढवित असल्याची माहिती समोर येत आहे. वाहतूकदारांनी कागदपत्रांमध्ये हेरफेर करून स्वतः तारखा वाढवून खदानींमध्ये ट्रक चालविण्याची परवानगी मिळविली आहे. कोळसा वाहतूकदार कमान्यांमध्ये असे बरेच ट्रक आहेत ज्यांचे फिटनेस, इन्शुरन्स, टॅक्स व परमिट सुद्धा लॅप्स झाले आहे. पण हे वाहतूकदार हातचलाखी करून स्वतःच कागदपत्रांच्या तारखा वाढवून बिनधास्त खादाणींमधून कोळशाची वाहतूक करित आहे. त्यामुळे प्रशासनाची मोठी फसवणूक होत आहे. या सर्व प्रकारांकडे आरटीओ विभागाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखे तर्फे करण्यात आली आहे. ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर व फिटनेस, इन्शुरन्स नसलेल्या ट्रकांवर कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशाराही वंचितने आरटीओ कार्यालयाला पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदनावर वंचितचे तालुकाध्यक्ष दिलिप भोयर, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, सुरज खैरे, प्रदीप वाघमारे, आकाश बोरकर, सुभाष परचाके, अजित जुनगरी, अनिल जांभुळकर, कपिल मेश्राम, अमित गाडगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.