गावखेड्यात घरोघरी सोल्याची भाजी


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

मारेगाव : दिवाळी संपताच शेतशिवारातील तुरीचे पिक बहरु लागते. तुरीच्या झाडावरील पिवळीधम्म फुलोर पाहुन गावखेड्यासह शहरवासीयांना वेध लागतात ते तुरीच्या शेंगातील ओल्या दाण्यांच्या भाजीची, ग्रामीण भागात त्यास सोले म्हटल्या जाते. सध्या ग्रामीण भागात घरोघरी गृहीणीं भाजीत तुरीच्या सोल्याना प्राधान्य देत असुन, खवय्ये सोल्यांच्या भाजीसह विविध तुरीच्या सोल्यापासुन तयार होत असलेल्या मेनुना प्राधान्य देत आहे. घरोघरी तुरीच्या सोल्यांची भाजीची धुम असल्याचे दिसुन येते.

हेमंत ऋतुत विविध भाजीपाला बाजारात दाखल होतो त्यात काही हंगामी वाल, पोपट, राजमा, चितरंग वाल, चवधारी वाल, वाटाणा भाजीपाल्यांचा समावेश असतानाच तुरीच्या शेंगाचीही भर पडते. पुर्वी दळणवळणाची साधने नसल्याने गावखेड्यात कमी प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत असे त्यावर पर्याय म्हणुन गावातील शेत शिवारात तयार होणार्‍या पिकातील शेंगा दाण्यांची भाजी करण्याचा प्रघात पडला तो आजतागायत कायम आहे. खरीप हंगामात बरबटी, मुंग, उडीद तर रब्बी हंगामात तुर, हरभरा, लाख यांच्या शेंगेतील दाण्यांची सोलेभाजीचा समावेश असतो.
तुरीच्या दाण्यांची वेगवेगळ्या प्रकारे भाजी केल्या जाते ह्यात पाट्यावर वाटुन केलेली पातळ भाजी (आरण), सोले वांगे, फोडणी दिलेली टमाटर टाकुन केलेली चटणी, नुसते दाणे भाजुन केलेली चटणी, कोभी टमाटर वांगे मिश्रीत भाजी, सोले भात यासह मिठ टाकुन उकळलेल्या शेंगा अशा नाना तर्‍हेने आहारात वापर होत असल्याने खवय्या तुरीच्या नाक मुरडत नसल्याचे दिसुन येते.
सध्या शेतात कापुस वेचणीचा हंगाम सुरु आहे. महिला मजुर कापुस वेचता वेचताच संध्याकाळच्या भाजीची बेगमी म्हणुन साडीच्या वट्यात शेतकर्‍यासह घरधनीची नजर चुकवत भरलेल्या शेंगा तोडते. हे ही कौशल्य वाखानण्याजोगे आहे. घरी परतल्यावर फावल्या वेळात शेंगेतुन दाणे काढल्या जाते शक्यतोवर वृद्ध मंडळी सोले काढण्याकामी हातभार लावतात.

पिग्झा, बर्गरच्या जमान्यात पनीर, मशरुमसारख्या भाजीस प्राधान्य देणारा अजुनही तुरीच्या सोल्याच्या भाजीस प्रथम प्राधान्य देतो हे ही तितकेच खरे आहे. परिणामी गावखेड्यासह शहरी भागातील स्वंयपाक घरात तुरीच्या सोलेभाजीची क्रेझ कायम आहे.
  

शेंगा पाठवण्याची पंरपरा कायम : 

गावखेड्यातुन शहरी भागात असलेले आप्त, सोयरे, संबंध असणार्‍यासह नोकरदार वर्गास सोल्याच्या भाजीचा आस्वाद घेण्याच्या सोईकरीता शेंगा पाठवल्या जाते.

हल्लीच्या मतलबी जगात कृतज्ञतेचा विसर पडला असतांनाही ग्रामीण भागात तुरीच्या शेंगा देण्याची परंपरा कायम राखुन आहे हे मात्र सत्य...
       
गावखेड्यात घरोघरी सोल्याची भाजी गावखेड्यात घरोघरी सोल्याची भाजी Reviewed by सह्याद्री चौफेर on December 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.