सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी-घुग्गुस मार्गावरील टोल नाका आता नागरिकांची डोके दुखी ठरू लागला आहे. आयव्हीआरसीएल कंपनी अंतर्गत उभारण्यात आलेला हा टोल नाका प्रदूषण वाढविण्याबरोबरच इतर अनेक समस्यांचे कारण बनू लागला आहे. टोल नाक्याच्या आजूबाजूला काळ्या भुकटीचे थर साचले असून टोल नाका परिसराची साफसफाई करण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. टोल नाका परिसरात व नाक्यापासून काही अंतरापर्यंत मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने या परिसरात नेहमी काळ धुकं पसरलेलं असतं. मुख्य मार्गावर कोळसा खदानींप्रमाणे काळ्या भुकटीचे थर साचलेले दिसतात. वाहनांच्या जाण्या येण्याने ती भुकटी उडून त्याचे धुळीत रूपांतर होते. टोल नाका परिसरापासून एवढी धूळ उडत असते की, काळं धुकं पसरल्यागत पुढचं काहीही दिसत नाही. या ठिकाणी ट्रकांची नेहमी रांग लागलेली असते. वाहतुकीचा या ठिकाणी नेहमी जाम लागत असतो. रेल्वे क्रॉसिंग टोल नाक्यापासून अगदीच जवळ असल्याने रेल्वे गेट बंद झाल्यास टोल नाक्यापर्यंत वाहनांची रांग लागत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतांना दिसतो. रोडची देखभाल व दुभाजकांमध्ये असलेल्या झाडांची निगा राखण्याची जबादारी आयआरव्हीसीएल या कंपनीची असून ते ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतांना दिसत नाही. वणी ते घुग्गुस व मारेगाव पर्यंतच्या रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी आयआरव्हीसीएल या कंपनीची आहे. रस्त्याला गेलेले तडे व रस्त्यावर आलेली झाडे झुडपे या कंपनीचा दुर्लक्षितपणा दर्शवित आहे. रस्त्याच्या कडेला एवढी झाडे झुडपे वाढली आहे की, लालगुडा टर्निंगवर समोरचे वाहन दिसत नाही. समोरचे वाहन न दिसल्याने या टर्निंगवर छोटे मोठे व विचित्र अपघातही झाले आहेत. साफसफाईकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्यावर काळ्या धुळीचे साम्राज्य पसरलेले दिसते. या रस्त्याने जाणे येणे करतांना त्वचा व कपडे दोन्ही कोळसा खदाणीतून आल्यागत काळे होतात. त्यामुळे या रस्त्याने जाणे येणे करणाऱ्या नागरिकांचा चांगलाच मनःस्ताप होतांना दिसतो. वणी घुग्गुस मार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या मार्गावर टोल नाका उभारण्यात आला. हा टोल नाका आता नागरिकांच्या असंतोषाचे कारण ठरू लागला आहे. अगदी शहराला लागूनच हा टोल नाका असून कोळसा वाहतूकदारांचा आर्थिक भार वाढवणारा हा टोल नाका ठरला आहे. कोळसा खदानींमधून रेल्वे सायडिंगवर कोळशाची अंतर्गत वाहतूक करणाऱ्या कोळसा वाहतूकदारांना या टोल नाक्यामुळे चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. कापसाच्या जिनिंगकडे जाण्याचा हाच सोयीस्कर मार्ग असतांनाही कापूस विक्रीकरिता येणारी वाहने टोल नाक्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने शहरातून वर्दळीच्या रस्त्याने जातांना दिसतात. लहान सहान कामांकरिता जाणे येणे करणारी अंतर्गत वाहने नेहमी टोल नाका देणे परवडत नसल्याने शहरातील अरुंद रस्त्यांने जात येत असतात. शहराला लागूनच हा टोल नाका उभारण्यात आल्याने अंतर्गत वाहतूकदारांनी आज पर्यंत चांगलाच आर्थिक भुर्दंड सहन केला आहे. माल वाहतुकीचे दर कमी, डिजलचे भाव जास्त व त्यातल्यात्यात टोल नाक्याचा अतिरिक्त भार वाहतूकदारांचे कंबरडे मोडू लागला आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास व अंतर्गत कोळशाची वाहतूक करतांना टोल टॅक्स भरण्याचा होणारा त्रास, आता सर्वांच्याच जिव्हाळी लागला आहे. एकप्रकारे हा टोल नाका आता वाहतूकदार व मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांची डोकेदुखी ठरू लागला आहे.