जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना निमित्त डॉक्टरांशी संवाद


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१९ ऑक्टो.) : जिल्हा सामान्य रुग्णालय व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून स्तनाचा कर्करोग जागरूकता महिना निमित्य डॉक्टर संवाद कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी शासकीय रुग्णालय चंद्रपूरच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.अर्चना वावरकर यांच्या सोबत संवाद साधण्यात आला.

दर वर्षी ऑक्टोबर महिना हा जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना म्हणून जगभरात पाळला जातो. महिलांमध्ये स्तन कर्करोगा विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऑक्टोबर महिन्यात विविध उपक्रम राबविले जातात. स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (ICMR) नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की 2020 मध्ये कर्करोगाच्या एकूण नवीन रुग्णांची संख्या 17.3 लाखांपर्यंत वाढेल. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे जगण्याची दर कमी आहेत यामागे कारण उशिरा निदान झाल्याने होते. तरुण महिलांमध्ये प्रजननक्षम वयोगटात सक्रिय संप्रेरक (Hormonal Imbalance) चढउतारांमुळे स्तनांचा कॅन्सर अधिक असल्याचे जाणवते तर पुरुषामध्ये १% स्तन कॅन्सरचे प्रमाण आहे. आजाराच्या सुरवातीलाच निदान झाले तर त्यावर उपचार करता येतात. प्रत्येक स्त्रीला स्तनांच्या कॅन्सर लक्षणांची माहिती असावी.

शासकीय रुग्णालय चंद्रपूरच्या स्त्री रोग तज्ज्ञ डॉ .वावरकर सांगतात भारतातील स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण पाहता ८ पैकी १ महिला स्तनाच्या कर्करोगाने पीडित आहेत. स्तनाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण भारतात जास्त आहे. जेथे स्तनाच्या कर्करोगाच्या दोन पैकी एक रुग्ण पाच वर्षांत मरण पावतो. यामागचे कारण म्हणजे स्तनाच्या कर्करोगाच्या तपासणीसंबंधी असलेल्या जागरूकतेचा अभाव ! स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त ४८ टक्के महिलांचे वय ५० वर्षापेक्षा कमी आहे.
 
स्तनाच्या कर्करोगाच्या जोखमीच्या घटकांमध्ये अनुवांशिकता, बैठी जीवनशैली, उशीराने होणारी गर्भधारणा, जास्त प्रमाणात अल्कोहोलचे सेवन, धूम्रपान, तरुणांमध्ये वाढलेला लठ्ठपणा, तणाव, कमी आहार घेणे ही प्रमुख कारणे आहेत. दुर्दैवाने, स्तनाच्या कर्करोगाचे सर्व जोखीम घटक पूर्णपणे काढून टाकण्याचे अद्याप कोणतेही मार्ग नाहीत.
 
अनुवांशिक जोखीम घटक जसे की काही विशिष्ट जनुकांमध्ये वारसाहक्काने झालेले बदल (BRCA1 आणि BRCA2 हे सर्वात सामान्य आहेत), कौटुंबिक इतिहास इत्यादी ! 

स्तन कर्करोगाची लक्षणं :

- स्तनांमध्ये गाठ

- स्तनांचा बदललेला आकार

- एक भाग कठीण जाणवणे

- त्वचेच्या पोतामध्ये बदल (संत्र्याची सालीसारखा दिसणे)

- लालसर पणा, पुरळ येणे

- स्तनांग्रंथामधून कोणताही दाब न देता द्रव बाहेर पडणे (Nipple Discharge)

- काखेजवळ सूज, वेदना होणे

प्रत्येक स्त्रीने योग्य तज्ञ डॉक्टर कडून तपासणी करणे गरजेचे आहे. स्तनाची तपासणी १८ वर्षांच्या वयात सुरू झाली, २५ वर्षांच्या वयापासून प्रत्येक सहा महिन्यांनी क्लिनिकल स्तनाची तपासणी, स्क्रीनिंग उपाय म्हणून ३० वर्षांच्या वयापासून स्तन मेमोग्राम/एमआरआय करणे आवश्यक आहे. या सर्वांचा सारांश, प्रभावी स्क्रीनिंग प्रोटोकॉल आणि जागरूकतेद्वारे त्याविषयी ज्ञान वेळीच स्तनाचा कर्करोग शोधण्यात मदत करते आणि म्हणूनच तो पूर्णपणे बरा होतो.
 
स्तनाच्या कॅन्सरचे तिहेरी मूल्यांकन

१) योग्य सर्जनकडे जाऊन तपासणी करणे (Clinical examination by Qualified Surgeon)
२)मॅमोग्राफी (by Qualified Radiologist)
३) बायोप्सी (FNAC, Biopsy)

उपचार पद्धती :

शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी/ हार्मोनल थेरपी (हिस्टोपॅथोलॉजी रिपोर्टवर आधारित)/ रेडिओथेरपी रुग्णाच्या कर्करोगाच्या टप्प्यावर अवलंबून उपचार करण्याचा निर्णय घेतला जातो. 
कर्करोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी किंवा शक्य तितक्या लवकर शोधून आपण प्रभाव कमी करू शकतो. वेळीच निदान होणे हे स्तनाच्या कर्करोगापासून सर्वोत्तम संरक्षण देते.  
    
काही स्त्रिया न्यूनगंडता बाळगतात व दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्यात कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी पोहचतात. या विषयी आपण सर्वानी न्यूनगंडता सोडून, या विषयीबाबतीत मोकळेपणाने बोलून, चर्चा करणे आणि स्तनाच्या कॅन्सरची योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट घेऊन जीवन गुणवत्ता अथवा जगण्याचा दर सुधारु या !
जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना निमित्त डॉक्टरांशी संवाद जागतिक स्तन कर्करोग जागरूकता महिना निमित्त डॉक्टरांशी संवाद Reviewed by सह्याद्री चौफेर on October 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.