अतिवृष्टीने कपाशी पाण्याखाली, पंचनामा पथकाकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (२० ऑगस्ट) : पंधरा दिवस दडी मारून बसलेल्या वरून राजाने १७ ऑगस्ट पासून जोरदार पावसाने हजेरी लावली. सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महागाव तालुका जलमय झाला असून, तालुक्यातील मुख्य पीक असलेली कपाशी शेती पाण्याखाली गेली आहे. सतत पाऊस आणि पूरस्थिती असल्यामुळे 'नुकसान' शब्द कानावर पडला तरी या परिसरातील शेतकरी भेदरलेला दिसतोय. गेल्या दीड आठवड्यापासून पाऊस नाहींच्या बराबर व्हता. मात्र, आता पूरामुळे भयानक वास्तव पाहून बळीराजाच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. सरकार आणि प्रशासनाने आता हातावर हात धरून न ठेवता त्वरित नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

महागांव तालुक्यात गेल्या काही दिवसात अतिवृष्टीने नको तो विक्रम केला आहे. सलग चार दिवस तालुक्यात महागावसह मालवागद, घोनसरा, मोहदी, दहिवड, बोंडारा या गावातील पूरस्थितीने शेतजमीन पाण्याखाली आली आहे. हा पूर इतका भीषण होता की तालुक्यातील अनेक पूल तोडून पाणी शेतात घुसून शेती जमीनदोस्त झाली. तालुक्यातील कपाशी पाण्याखाली गेल्यामुळे महिनाभरातच हा हंगाम संपुष्टात येईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

पुराच्या पाण्याने शेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे माळवाकद येथील शेतकरी मनोज पानपटे यांनी शासनाच्या मदतीची नितांत गरज असून मी आर्थिक संकटात सापडलो आहे. असे त्यांनी सांगितले. डोक्यावरील कर्जाचे ओझे आणि कुटुंबातील सहा व्यक्तीचा जीवनाचा गाडा हाकलने आता अवघड चाललंय अशी सध्याची परिस्थिती आल्याचे सांगितले. पिक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा, कृषी विभाग व लोकप्रतिनिधींनी शेतकरी, ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा व दिलासा द्यावा अशी ग्रामीण भागातून केली जात आहे.
    (मनोज पानपटे (माळवाकद) यांच्या शेतातील जमीनदोस्त झालेली कपाशी)

महागाव तालुक्यात अतिवृष्टी, महापूरमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी शेती पूर्णत: नष्ट झाली आहे. त्यामुळे शेतकरी, सामान्य नागरिक हतबल झाले आहेत. याबाबत आमच्या प्रतिनिधीनी तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी तलाठी, कृषी सहाय्यक यांनी पाहणी केली आहे. अंदाजे ५० हेक्टर च्या जवळपास जमीन पाण्याखाली आली आहे. नुकसानीबाबत पंचनामे येत्या दोन तीन दिवसात करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.  
अतिवृष्टीने कपाशी पाण्याखाली, पंचनामा पथकाकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे अतिवृष्टीने कपाशी पाण्याखाली, पंचनामा पथकाकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे Reviewed by सह्याद्री चौफेर on August 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.