शहर व तालुक्यात आले आहे ओव्हरलोड माल वाहतुकीला उधाण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.८) : शहर व तालुक्यात मागील काही महिन्यांमध्ये ओव्हरलोड माल वाहतुकीला चांगलेच उधाण आले आहे. शहर व तालुक्यातून राजरोसपणे ओव्हरलोड माल वाहतूक सुरु असून वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

ओव्हरलोड माल वाहतुकीमुळे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची हालत खस्ता होत असून अल्पावधीतच रस्त्यांना तडे जाण्यास सुरुवात झाली आहे. वाहतूकदार ओव्हरलोड माल वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही होऊ नये, याकरिता स्थानिक वाहतूक विभागाला व प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या ठरलेल्या प्रतिनिधी मार्फत मासिक एंट्री देत असल्याची चर्चा वाहतूकदारांमधून ऐकायला मिळत आहे. संबंधित वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधी जवळ ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ट्रकचे नंबर व वाहतूकदाराचे नाव देऊन प्रति ट्रक ठरलेली रक्कम दिल्यास त्या ट्रकांवर संबंधित अधिकारीवर्ग कार्यवाही करीत नसल्याने वाहतूकदारांचे चांगलेच फावत असून तालुक्यात ओव्हरलोड वाहतुकीवर नियंत्रण राहिले नसल्याचे दिसून येत आहे. ओव्हरलोड माल वाहतुकीमुळे रस्ते दीर्घकाळ टिकणार नसल्याच्या चर्चा कंत्राटदारवर्गातूनच ऐकायला मिळत आहे. 

मुकुटबन येथे रिलायन्स समूहाच्या सिमेंट प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून आता हा प्रकल्प बिर्ला समूहाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये सिमेंट तयार करण्याकरिता लागणाऱ्या कच्च्या मालाचा साठा करणे सुरु असून आसपासच्या परिसरातील खडकाळ भागातून सिमेंट उपयोगी दगडाची (लाइमस्टोन) मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु आहे. तालुक्यातील वनोजा व गौराळा गाव शिवारात असलेल्या खडकाळ भागात लाइमस्टोनचे उत्खनन सुरु असून मुकुटबन येथील सिमेंट प्रकल्पामध्ये ट्रकांद्वारे या सिमेंट उपयोगी दगडाची वाहतूक सुरु आहे. या दोनही लाइमस्टोन खदानींमधून सुरुवाती पासूनच ओव्हरलोड लाइमस्टोनची वाहतूक सुरु आहे. ट्रकच्या पासिंग क्षमतेपेक्षा किती तरी जास्त वजन घेऊन ट्रक रस्त्याने धावत आहे. ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहतूकदार व पुरवठादार यांना मोठा आर्थिक लाभ मिळत असला तरी नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची हालत मात्र चांगलीच खस्ता होतांना दिसत आहे.
वणी वरून मुकुटबन येथे ओव्हरलोड लाइमस्टोन तर जातच आहे, पण डबल धमाका ऑफरमध्ये अडेगाव गिट्टी खदानी मधून राजूर व वणी एमआयडीसी येथील चुना कारखान्यांमध्ये ओव्हरलोड डोलामाईटचीही वाहतूक सुरु आहे. अडेगाव येथे दोन डोलोमाईटच्या खदानी व क्रेशर असून तेथून राजूर व वणी एमआयडीसी परिसरातील चुना कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डोलोमाईटची ओव्हरलोड वाहतूक करण्यात येते. अडेगाव येथून क्षमतेपेक्षा जास्त डोलोमाईट ट्रकांमध्ये भरून आणला जात आहे. वाहतूकदारानी ट्रकांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल यावा, याकरिता ट्रकच्या बॉडीला अतिरिक्त रीप लावून बॉडीची उंची वाढविली आहे. वणी वरून मुकुटबन व अडेगाव वरून वणी परिसरात कित्येक महिन्यांपासून ओव्हरलोड वाहतूक सुरु असतांनाही स्थानिक वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या वाहतूकदारांशी असलेल्या संबंधाची तालुक्यात खुली चर्चा होऊ लागली आहे.

 नागरिकांच्या व वाहतुकीच्या सुविधेकरिता कोट्यावधी रुपये खर्च करून शासन रस्तेबांधणी करीत आहे. पण ओव्हरलोड वाहतुकीमुळे अल्पावधीतच रस्त्यांची दुर्दशा होत आहे. ओव्हरलोड वाहतुकीला वेळीच लगाम न लावल्यास नव्याने तयार केले रस्ते उखडल्या शिवाय राहणार नाही.
शहर व तालुक्यात आले आहे ओव्हरलोड माल वाहतुकीला उधाण शहर व तालुक्यात आले आहे ओव्हरलोड माल वाहतुकीला उधाण  Reviewed by सह्याद्री चौफेर on June 08, 2021 Rating: 5
Powered by Blogger.