चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : गेल्या काही आठवडाभरापासून दारव्हा तालुक्यात सार्वत्रिक संततधार पाऊस दिवस रात्र पडत आहे. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे.अडान नदी, गोकी धरण काठाचे नाले फुटल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी खरडून गेल्या असून सततच्या पावसाने सर्वच शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देवून पिक नुकसानीचा पंचनामा, सर्वेक्षण करून शासनाची आर्थिक मदत देण्याची गरज असताना मात्र, पंधरा दिवस उलटूनही मंत्री मंडळ विस्तार व सरकारचा समतोल स्थिर न झाल्यामुळे हतबल झाला आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या दारव्हा तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील आठ दिवसापासून अतिवृष्टीच्या संततधार पावसाचा फटका बसत आहे. या सतत व अति पावसामुळे अडान नदी भागातील नदी लगतचे बंधारे, पूल फुटून अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे. तर तालुक्यात अनेक भागात पावसाने थैमान घातल्याने नदी, नाल्याला पूर येउन पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्राची पाहणी करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी पिडीत शेतकरी करीत असताना सध्या अस्थिर असलेल्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
तालुक्यात आषाढी पौर्णिमेच्या आदल्या दिवसापासून संततधार पावसाने थैमान घालून शेकडो हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. अजूनही पावसाने उसंत न घेतल्यामुळे दिवस रात्र सुरु असलेल्या पावसाने शेतात पाणी साचत आहे. यात शेतकरी, शेतमजूरांची दयनीय अवस्था होत आहे. खरीप हंगामाला सुरुवात होताच पावसाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी महागडे बि -बियाणे, खते आणून वेळेवर पेरणीला सुरुवात केली. परंतु पेरणीनंतर सततच्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.
सतत च्या पावसाने नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे शाळेला विद्यार्थ्यांना जाण्यासाठी अडचण येतात आहे व ग्रामीण भागात धावणारी लाल परीची चाके पावसामुळे थांबली आहेत. अशा परिस्थितीत मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे. मात्र सरकारमध्येच बंडाळी उडाली असल्याने जनतेच्या प्रश्नासाठी लाखो मतदारांच्या आशीर्वादाने निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधिनी या समस्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. असा सुर जनतेतून उमटत असून प्रशासन सुद्धा नुकसान भरपाई संदर्भात लक्ष केंद्रित कधी होईल याकडे तालुक्यातील बळीराजा चे लक्ष लागले आहे.