सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याला आळा घालण्यासाठी आणि तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने १६ नोव्हेंबर रोजी विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान नागपूर–चंद्रपूर मार्गावरील हॉटेल्स, लॉजेस, ढाबे तसेच निर्जन ठिकाणी पोलिसांनी अचानक धाडी मारून तपासणी केली.
या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी व पोलीस अंमलदार सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेल्स, लॉजेस व ढाब्यांची तपासणी केली. अमली पदार्थांची अवैध वाहतूक, साठवणूक किंवा वापर रोखण्याच्या दृष्टीने ही तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान कोणतेही अमली पदार्थ अथवा संशयास्पद व्यक्ती किंवा मालमत्ता आढळून आली नसल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अशा प्रकारच्या अचानक तपासण्या जिल्ह्यात नियमितपणे सुरू राहणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरुणाईने अमली पदार्थांपासून दूर राहावे, व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि पोलिसांच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने केले आहे.