सह्याद्री चौफेर | योगेश मडावी
झरी जामणी : तालुक्यातील मुळगव्हाण येथे १५ नोव्हेंबर रोजी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या क्रांतिकारी कार्याचे स्मरण करण्यात आले. जयंतीनिमित्त आयोजित वैचारिक मंथनातून आदिवासी समाजाची एकजूट, राजकीय नेतृत्व, सामाजिक हक्क आणि तरुणांची भूमिका या विषयांवर मान्यवरांनी परखड मते मांडली.
आदिवासी समाजाचे ऐतिहासिक नेतृत्व करणारे स्वर्गीय माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी आमदार लखुजी मेश्राम यांच्या कार्यभूमीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावातून सामाजिक व राजकीय प्रवास सुरू करून जिल्हा परिषद ते विधानसभेपर्यंत मजल मारणाऱ्या लखुजी मेश्राम यांच्या नेतृत्वाचा आदर्श यावेळी अधोरेखित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मराज मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य धर्माजी आत्राम, विठ्ठल उईके आणि बंडू आडे उपस्थित होते. प्रमुख वक्ते चेतन कुडमते, योगेश मडावी, वासुदेव तोडसाम, मारोती कुसराम, नीरज मडावी, अशोक आत्राम आणि अमोल जुमनाके यांनी मार्गदर्शन केले.
आदिवासी बहुल तालुका असूनही राजकीय क्षेत्रात समाजाला अपेक्षित प्रतिनिधित्व आणि सक्षम नेतृत्व का मिळत नाही, विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून समाजाच्या पदरात काय पडले आणि समाजाचे हक्क व प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी स्वतंत्र नेतृत्वाची गरज किती महत्त्वाची आहे, अशा मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. केवळ राजकीय पक्षांच्या मागे न लागता समाजहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व उभे करणे, तरुणांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय व्हावे आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन संघटित शक्ती निर्माण करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी दिलेला लढा आजही आदिवासी समाजाला प्रेरणा देणारा आहे. समाजाने आपली अस्मिता, संस्कृती आणि स्वाभिमान जपत हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याची गरजही वक्त्यांनी व्यक्त केली.
भगवान बिरसा मुंडा यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा आणि स्वर्गीय लखुजी मेश्राम यांच्या नेतृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आदिवासी समाजाच्या सामाजिक व राजकीय सक्षमीकरणासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार या जयंती सोहळ्यात व्यक्त करण्यात आला. त्यामुळे मुळगव्हाण येथील हा कार्यक्रम केवळ जयंती उत्सव न ठरता समाजाच्या भविष्यातील नेतृत्वावर विचारमंथन करणारा ठरला.