सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथे भरचौकात कुऱ्हाडीने वार करून एका व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी पांढरकवडा येथील सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
ही घटना ९ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री आठच्या सुमारास मार्डी येथे घडली होती. आरोपी प्रदीप ऊर्फ काल्या गोविंदराव भालशंकर (वय ३८, रा. मार्डी) याने कैलास बंडू सलाम यांच्यावर कुऱ्हाडीने डोके, गळा, छाती तसेच शरीराच्या इतर भागांवर वार केले. या हल्ल्यात सलाम यांचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्यानंतर हे प्रकरण पांढरकवडा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी दाखल झाले.
या खटल्यात सरकारी अभियोक्ता रमेश देविदास मोरे यांनी सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासले. त्यामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अभियोजन पक्षाने सादर केलेले पुरावे आणि युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला.

