टॉप बातम्या

शाळेच्या आठवणींना उजाळा देत ५८ वर्षांनी भरले स्नेहमिलन

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : वणी नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील सन १९६४ ते १९६८ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा ५८ वर्षांनंतर स्नेहमिलन सोहळा बुधवार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कै. म. ता. राजूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमातून माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शाळा व समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी नगराध्यक्षा विद्याताई आत्राम होत्या. सेवानिवृत्त तहसीलदार एम. बी. लामगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, शिक्षण सभापती सोनाली निमकर व शाळेच्या मुख्याध्यापिका पोयाम उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार अनिल मुजगेवार, मंगला मालेकर व संध्या वनकर यांच्या हस्ते करण्यात आला.

माजी विद्यार्थी दीपक गुंठेवार यांनी प्रास्ताविकातून कै. म. ता. राजूरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. अनिल मुजगेवार यांनी जीवनातील गुरुचे महत्त्व विशद केले. यावेळी माजी विद्यार्थ्यांतर्फे शाळेतील वर्गाची रंगरंगोटी करण्यात आली. तसेच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला मिल्टन कंपनीची वॉटर बॅग देण्यात आली.

शाळेतील विद्यार्थ्यांची घटती संख्या आणि इमारतीची जीर्ण अवस्था याबाबत माजी विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत नगराध्यक्षा व शिक्षण सभापती यांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांना क्रिकेट किट, व्हॉलीबॉल, लगोरी तसेच अन्य क्रीडा साहित्याचेही वाटप करण्यात आले.

माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी ५८ वर्षांनंतर झालेल्या या स्नेहमिलनाचे कौतुक करत कै. म. ता. राजूरकर यांच्या कार्याला उजाळा दिला आणि माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे संचालन अनिल मुजगेवार यांनी केले, तर आभार एम. बी. लामगे यांनी मानले. स्नेहमिलन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मधुकर लामगे, दीपक गुंठेवार, विजय कोटेचा, अरुण निमजे, नामदेव चव्हाण, कैलास आक्केवार, प्रदीप चिंडालीया, सतीश आदमने, नंदकिशोर कांबळे, अरुण पुरवार, तसेच वीणा सातपुते, मंगला मालेकर व संध्या वनकर यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();