सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वेकोलीच्या प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकरी व नागरिकांच्या प्रश्नांना थेट जाणून घेण्यासाठी आमदार तथा शिवसेना (विदर्भ) नेते बच्चूभाऊ कडू ८ ऑक्टोबर रोजी बोरगाव (अहेरी) येथे दाखल होणार आहेत. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत प्रकल्प परिसराची पाहणी आणि नागरिकांशी संवाद होणार आहे.
वेकोलीच्या विस्तारामुळे शेतजमीन, रोजगार, पुनर्वसन आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बाधितांची प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. जमिनीचा मोबदला, भूसंपादनातील अडचणी, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी, प्रदूषणाचा प्रश्न आणि पुनर्वसन या मुद्यांवर यावेळी बाधितांकडून माहिती घेतली जाणार आहे.
केवळ निवेदनांपुरते प्रश्न न राहता प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न या दौऱ्यात केला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील बाधित शेतकरी, कामगार आणि नागरिकांनी आपापल्या समस्या मांडण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल उलमाले यांचेकडून करण्यात आले आहे.
वेकोली प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर या पाहणीदरम्यान नेमकी कोणती माहिती समोर येते आणि पुढील कार्यवाहीची दिशा काय ठरते, याकडे प्रकल्पबाधितांचे लक्ष लागले आहे.


