सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : कोळसा खाणीसाठी जमिनी दिल्या, पुनर्वसनही झाले; मात्र गावकऱ्यांच्या दैनंदिन समस्या आजही सुटलेल्या नाहीत. या परिस्थितीविरोधात आता बोरगाव परिसरातील प्रकल्पबाधित नागरिक आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या मागण्यांना पाठबळ देण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी पुढाकार घेतला असून, १८ व १९ ऑक्टोबर रोजी कोळसा खाण परिसरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
वेकोलि प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी विधानपरिषद सदस्य तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी वणी परिसराचा दौरा केला. भालर वसाहतीजवळील बोरगाव पुनर्वसन परिसरात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
सुविधांचा अभाव, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न
बोरगावमधील नागरिकांनी पिण्याचे पाणी, वीजपुरवठा आणि रस्त्यांसह अनेक मूलभूत प्रश्न मांडले. स्थानिक युवकांना रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रकल्पासाठी त्याग करूनही अपेक्षित सुविधा मिळत नसतील, तर पुनर्वसनाचा नेमका लाभ काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत बच्चू कडू यांनी या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले. प्रकल्पबाधितांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्षाची भूमिका घेण्याचे संकेत त्यांनी दिले. मागण्यांची पूर्तता झाली नाही, तर खाणीचे काम बंद पाडण्यापर्यंत आंदोलन नेण्याचा इशाराही त्यांनी दिला.
दबावापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्यआंदोलनात सहभागी होण्यासाठी त्यांनी परिसरातील नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन केले. आंदोलन रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणला, तरी माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे बोरगावमधील प्रकल्पबाधितांच्या प्रश्नांवर येत्या काळात संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रहार संघटनेचे वणी विधानसभा अध्यक्ष सतीश देरकर आणि प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुवीर कारेकर यांनी केले होते. यावेळी प्रहारचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख प्रवीण हेंडवे, शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख मुकेश जीवतोडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. दौऱ्याच्या आयोजनासाठी राकेश उरकुडे, संजय मडावी, विवेक वाघमारे, विठ्ठल विरुटकर, श्याम उईके, योगेश पोटे, रमेश मंगाम, नागेश पाझारे, मुरलीधर खोकले, कुंदन मडावी यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
आता या आंदोलनातून प्रकल्पबाधितांच्या मूलभूत सुविधांचा आणि रोजगाराचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे बोरगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


