टॉप बातम्या

रोखठोक भूमिका, आक्रमक नेतृत्व! अजिंक्यदादा शेंडे युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : युवकांचे प्रश्न असोत, सर्वसामान्य जनतेच्या समस्या असोत किंवा जनहिताचे मुद्दे; प्रत्येक विषयावर रोखठोक भूमिका मांडत अन्यायाविरुद्ध आवाज उठविणारे कट्टर शिवसैनिक अजिंक्यदादा शेंडे यांची युवासेनेच्या यवतमाळ उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असून, या नियुक्तीमुळे वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक आणि युवासैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

शिवसेनेचे मुख्यनेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि युवासेना कार्याध्यक्ष प्रवेश सरनाईक यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा मतदारसंघात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करण्याची जबाबदारी अजिंक्य शेंडे यांच्यावर सोपविण्यात आली.

जनतेच्या प्रश्नांवर रोखठोक भूमिका, हीच कार्यशैलीची ओळख!

सर्वसामान्यांच्या अडचणी आणि युवकांच्या हक्कांशी संबंधित प्रश्नांवर स्पष्टपणे भूमिका मांडणे, हा अजिंक्यदादा शेंडे यांच्या कार्यपद्धतीचा महत्त्वाचा पैलू राहिला आहे. जनहिताच्या मुद्द्यांवर ठामपणे आवाज उठविण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या याच कार्यशैलीचा आणि संघटनात्मक योगदानाचा आगामी काळात युवासेनेला फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

उपजिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी म्हणजे केवळ पदाचा सन्मान नसून, युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी पाठपुरावा करणे आणि पक्षसंघटनेला तळागाळापर्यंत अधिक बळकट करणे, असे महत्त्वाचे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अजिंक्यदादा शेंडे यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांच्या पुढील राजकीय आणि संघटनात्मक वाटचालीसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

बाळासाहेबांचे हिंदुत्व आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रसार करण्याचे आवाहन

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा प्रचार व प्रसार करणे, सर्वांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी कार्य करणे आणि संघटनात्मक जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, विधानपरिषदेचे आमदार कृपाल तुमाने, युवासेनेचे राज्य सचिव शुभम नवले आणि युवासेना महाराष्ट्र कार्यकारी सदस्य हर्षल शिंदे यांच्या हस्ते अजिंक्यदादा शेंडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजिंक्यदादा शेंडे यांच्या नियुक्तीबद्दल सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, वणी विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, नव्या जबाबदारीतून त्यांच्या हातून युवकांचे प्रश्न, जनहिताची कामे आणि पक्षसंघटनेच्या बळकटीकरणासाठी भरीव कार्य घडावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();