सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजातील एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचे प्रभावी माध्यम आहे. उत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजहिताचा संदेश देता येतो, असे प्रतिपादन ॲड. कुणाल चोरडिया यांनी केले.
वणी शहरातील सर्वोदय चौक येथे साई गणेश मंडळाच्या वतीने हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपती उत्सवानिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. चोरडिया बोलत होते.
गणरायाला निरोप दिल्यानंतर त्यांचे स्मरण म्हणून हाडपक्या गणपती उत्सव साजरा करण्याची परंपरा असल्याचे सांगत, अशा सार्वजनिक उत्सवांमुळे नागरिकांमध्ये आपुलकी व सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ होते, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी पत्रकार राजू धावंजेवार, परशुराम पोटे, डॉ. खापणे, सुनील इंदुवामन ठाकरे, जवाहर अरोरा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सुनील इंदुवामन ठाकरे यांनी हाडपक्या अर्थात मस्कऱ्या गणपतीच्या इतिहासाची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी विविध मान्यवरांनी प्रसंगानुरूप मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे संचालन संतोष कर्णेवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे दिनेश दुर्गे, सफल आनंदवार, सुजल मांढरे, गणेश पारशिवे, राहुल आनंदवार, राहुल दांडेकर, तुषार भांडेकर, प्रवीण दुर्गे, पवन दुर्गे, रवी नान्ने, ईश्वर पारशिवे यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


