टॉप बातम्या

वणी वॉटर वर्क्समधील २१ वृक्ष तोडण्यास मानवी हक्क सुरक्षा परिषदेचा तीव्र विरोध

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणीनवीन अमृत योजनेअंतर्गत वणी शहरात प्रस्तावित नवीन जलशुद्धीकरण केंद्रासाठी वणी वॉटर वर्क्स परिसरातील २१ वृक्ष तोडण्याच्या निर्णयाला मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात नगर परिषद वणीचे मुख्याधिकारी सचिन गाडे तसेच नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम यांना निवेदन सादर करून संबंधित वृक्षांची तोड तात्काळ थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

एका प्रसिद्ध दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरनाम्यानुसार, नवीन अमृत योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी वॉटर सप्लायच्या विद्यमान जागेची निवड करण्यात आली आहे. मात्र या परिसरात अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात हिरवेगार, पर्यावरणपूरक व सावली देणारे वृक्ष अस्तित्वात आहेत. या वृक्षांची तोड झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडण्याबरोबरच शहराच्या हरित वारशालाही धक्का बसेल, असे मानवी हक्क सुरक्षा परिषदेने निवेदनात नमूद केले आहे.

विकासकामे महत्त्वाची असली तरी पर्यावरणाचे संवर्धन ही आजच्या काळाची अत्यावश्यक गरज असल्याचे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी अधोरेखित केले. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्रासाठी सध्याची जागा न वापरता वॉटर वर्क्स परिसरालगत असलेल्या संत नगाजी महाराज मंदिरासमोरील उपलब्ध जागेचा पर्याय विचारात घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच नगर परिषदेकडे शहरातील इतर अनेक ठिकाणी उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागांवरही नवीन प्लांट उभारता येऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख परशुराम पोटे तसेच वणी शहर महिला अध्यक्ष सौ. प्रमिला चौधरी उपस्थित होते. पर्यावरणाचा विचार करून वृक्षतोड टाळावी व पर्यायी जागेवर प्रकल्प उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();