सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : समाजसेवा, लोकांप्रती असलेली आपुलकी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने धावून जाणारे जनसेवक म्हणून ओळख असलेले काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरात उत्साहाचे आणि सामाजिक बांधिलकीचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित विविध सामाजिक उपक्रमांमुळे शहरात दिवसभर आनंद, उत्साह आणि जनसेवेची भावना अनुभवायला मिळाली.
दि. २३ मे रोजी सकाळी श्री रंगनाथ स्वामी मंदिर येथे देवस्थान समितीच्या वतीने संजूभाऊ खाडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित स्नेहसंमेलनात शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजूभाऊंना शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे, सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या वृत्तीमुळे आणि युवकांच्या, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दिलेल्या योगदानामुळे उपस्थितांमध्ये विशेष आत्मीयता दिसून आली.
“नेतृत्व म्हणजे केवळ राजकारण नाही, तर लोकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे,” हे संजूभाऊ खाडे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली. शहरासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, युवक, ज्येष्ठ मंडळी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहत संजूभाऊंप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त केला.
यानंतर सकाळी १०.३० वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उत्तरदायित्व जपले. या उपक्रमामुळे वाढदिवसाला सामाजिक सेवेचे प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
दुपारच्या सत्रात बाजीराव महाराज वृद्धाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. वृद्धांप्रती कृतज्ञता आणि माणुसकीची भावना जपत हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळवाटप करून त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या उपक्रमांमुळे वाढदिवस हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता समाजाशी नाळ जोडणारा सेवाभावी उत्सव ठरला.
या सर्व सामाजिक उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी संजय खाडे फाउंडेशन, जय जगन्नाथ मल्टीस्टेट पतसंस्था, श्री लक्ष्मीनारायण पतसंस्था तसेच संजय खाडे मित्रपरिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण शहरात दिवसभर संजूभाऊंच्या जनसेवेची आणि कार्यपद्धतीची सकारात्मक चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव तथा जनसेवक संजय खाडे यांचा वाढदिवस खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वणी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संजय खाडे यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना संजय खाडे यांनी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर ठाम विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “काँग्रेस हा केवळ पक्ष नसून एक व्यापक विचार आहे. जनतेच्या हक्कांसाठी आणि लोकशाही मूल्यांसाठी लढणारी काँग्रेस विचारधारा कधीही संपुष्टात येऊ शकत नाही. येणाऱ्या काळात काँग्रेस पक्ष जनतेसमोर एक सक्षम आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून उभा राहील.”तसेच संघटनात्मक पातळीवर पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांसह सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी काँग्रेस पक्षाचा आवाज अधिक बुलंद करण्याचे काम पुढेही सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.