सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नाचण्यासाठी नाही तर वाचण्यासाठी आहे. त्यांचे सर्वसमावेश कार्य इतके मोठे आहे की, ते खऱ्या अर्थाने विश्व रत्न आहेत. बाबासाहेबांना दलितांचे कैवारी म्हटल्या जाते. पण त्यांच्या कृतीतून त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दलितांपेक्षा इतर समाजातील गोरगरीब पुरुष व महिलांचा जास्त विचार करून काम केले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांचे कैवारी होते असे प्रतिपादन येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांनी केले.
संस्कार भारती, जैताई मंदिर आणि सागर झेप बहुउद्देशीय संस्था, वणी यांच्या संयुक्त विद्यमाने द्वारे आयोजित भारत माता पूजा उत्सवात युगपुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावर जैताई मंदिरात ते दिनांक 25 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैताई मंदिराचे अध्यक्ष माधवराव सरपटवार हे होते. अतिथी म्हणून संस्कार भारतीच्या संध्या अवताडे या उपस्थित होत्या.
आपला विषय मांडताना डॉ. राजपूत म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांनी देशाची घटना तयार करतांना अनुसूचित जातीच्या कलमाआधी इतर मागासवर्गीय समाजासाठीच्या कलमांचा अंतर्भाव केला. सरकार मध्ये मिळालेल्या अधिकाराचा उपयोग करून शेतकरी, नोकरदार, महिला, कामगार यांच्यासाठी भविष्याचा विचार करून निर्णय घेतले, कायदे केले. हिंदू कोड बिल व ओबीसी आयोगासाठी तत्कालीन सरकारने केलेल्या चालढकलीचे विरोधात मंत्रिमंडळाचा राजीनामा देणारे बाबासाहेब हे दूरदृष्टीचे युगपुरुष होते.
या प्रसंगी आयोजक संस्थेकडून भावी पिढीचे भविष्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम क्रमांक तेजस्विनी गव्हाणे, द्वितीय कांचन गुरनुले, तृतीय तर्फीया अन्सार शेख, व चतुर्थ क्रमांक झिनथ अन्सार शेख यांनी मिळविला होता. त्यांच्यासह इतर 6 स्पर्धकाना प्रोत्साहन बक्षिसे देण्यात आली. व यातील पहिल्या दोन क्रमांकाच्या स्पर्धकांना पुन्हा या मंचावरून भाषण देण्याची संधी देण्यात आली.
अध्यक्षीय भाषण करताना माधव सरपटवार युगपुरुष डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महती विषद केली. कार्यक्रमाचा आरंभ सुप्रिया केदारने सादर केलेल्या खरा तो एकची धर्म या साने गुरुजींच्या गीताने सुरु करण्यात आला. प्रास्ताविक प्रवीण सातपुते यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया केदार यांनी तर पाहुण्यांचा परिचय व आभार कार्यक्रमाचे आयोजक सागर मुने यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता विजय गंधेवार प्रस्तुत महाराष्ट्र गीताने करण्यात आली. बंधू भगिनींची उपस्थिती विशेष उल्लेखनीय होती. राजू खुसपुरे, उम्हाकांत म्हसे, पंढरीनाथ सोनटक्के, अर्पित मोहुर्ले, संस्कार भारती समिती अध्यक्ष रजनी पोयाम, राजू तुराणकर, मनोज उरकुडे, बाळू हेडाऊ, प्रज्वल ठेंगणे, उमेश पोद्दार, शेखर वांढरे, घनश्याम आवारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांचे कैवारी होते- प्रा. डॉ. करमसिंग राजपूत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 27, 2025
Rating: