आता ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घ्यावी - संजय खाडे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : गेल्या अनेक वर्षांपासून जनसेवा हिच ईश्वसेवा हेच समजून मी सामाजिक कार्य, लोकसेवा करीत आहे. यावेळी मतदारांनी संधी दिल्यास हेच तत्व पाळून यापुढेही असेच कार्य सुरु राहिल. त्यामुळे आता ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घ्यावी, असे आवाहन संजय खाडे यांनी कायर येथील सभेत मतदारांना केले. शुक्रवारी संजय खाडे यांचा कायर सर्कल मध्ये प्रचार दौरा झाला. त्यांनी सुमारे 20 गावांचा दौरा केला. या दौ-याला माजी आमदार विश्वास नांदेकर व वासूदेव विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती. 
शुक्रवारी अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या प्रचाराची सुरुवात वणी येथील सरोदे चौक येथून झाली. क्रांतीविर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून प्रचार ताफा इजासन येथे पोहोचला. त्यानंतर गोडगाव, परसोडा, साखरा, दरा, बोपापूर, बाळापूर येथे प्रचार दौरा झाला. यावेळी गावक-यांनी संजय खाडे यांचे हार घालून स्वागत केले तर महिलांनी औक्षण करीत आशीर्वाद दिला. गावात वाजत गाजत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर सिंधी वाढोणा, पिल्की वाढोणा येथे पदयात्रा काढून प्रचार ताफा कायर येथे पोहोचला. येथे पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर प्रचार सभा झाली. या सभेला पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते. सभेत खाडे यांनी लोकप्रतिनिधी व सरकारवर घाणाघात केला.
शेतक-यांचे प्रश्न विधानसभेत उचलून धरणार - संजय खाडे  
शेतमाला भाव नाही. शेतक-यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन आपल्या परिसरातील शेतकरी आत्महत्या करीत आहे. मात्र आपले लोकप्रतिनिधींनी शेतक-यांचा एकही प्रश्न विधानसभेत उचलला नाही. मतदारसंघात विकासाच्या नावावर निकृष्ट दर्जाचे कामं झाली आहेत. रस्त्याला अवघ्या चार महिन्यात खड्डे पडत आहे. खेडोपाडी पांदण रस्ते नाहीत. असा घाणाघात खाडे यांनी सभेत केला. यासह शेतक-यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी मतदारांनी एक संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी सभेत केले. 
सभेत बोलताना विश्वास नांदेकर यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर सरकारवर धोरणांवर टिका केली. तर वासूदेव विधाते यांनी स्थानिक प्रश्नांना वाचा फोडली. कायर नंतर चेंडकापूर येथे प्रचार ताफा पोहोचला. येथे त्यांनी तरुणांशी संवाद साधला. त्यानंतर पुरड, नेरड, उमरी येथे पदयात्रा निघाली. उमरी येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. शनिवारी खाडे यांचा शिंदोला-कायर सर्कलचा दौरा आहे. ढाकोरी, निंबाळा, देऊरपाडा, पारडी, कुरई, डोर्ली, वेळाबाई, मोहदा, कृष्णानपूर, टुंड्रा, आमलोन, तेजापूर इत्यादी गावांचा दौरा आहे. तेजापूर येथे कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली आहे.
आता ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घ्यावी - संजय खाडे आता ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घ्यावी - संजय खाडे Reviewed by सह्याद्री चौफेर on November 15, 2024 Rating: 5
Powered by Blogger.