सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : शासनाकडून प्रत्येकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. मात्र, तालुक्यातील अनेक गावात अद्याप पाणी न आल्याने साहेब, जलजीवन मिशनचे पाणी घरापर्यंत कधी येणार' असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तालुक्यात वाजतगाजत जलजीवन मिशनच्या कामाला सुरुवात झाली. अनेक गावांत मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे करण्यात येत आहेत.
अनेक गावांमध्ये टाकीची कामे पूर्ण झाले, विहिरीचे काम झाले व पाईपलाईन टाकली. परंतु, अजूनही पाणी नागरिकांच्या घरापर्यंत न पोहोचल्याने जलजीवन मिशनचे पाणी कधी पोहोचेल, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
पाईपलाईनसाठी रस्ते खोदले. रस्ते खोदल्याने अनेक गावांमध्ये खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले. या रस्त्यांची अजूनपर्यंत डागडुजी केली नाही. पाऊस आला की रस्ते चिखलमय होऊन अख्या गावामध्ये चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य पसरते.
याविषयी अनेक गावांमधून तक्रारीसुद्धा आल्या होत्या. परंतु, जलजीवन मिशन विभागाने याकडे लक्ष दिले नाही. जलजीवन मिशनचे पाणी कधीपर्यंत घरापर्यंत येणार याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे. उन्हाळा लागण्यापूर्वी पाणी मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तूर्तास जलमिशनचे पाणी घरापर्यंत न येता डोळ्यात मात्र, येण्याची वेळ आली आहे.
जलमिशनने आणले डोळ्यात पाणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2024
Rating: