टॉप बातम्या

खळबळजनक...राळेगावात भरदुपारी चाकुने युवकावर हल्ला

सह्याद्री चौफेर | विनोद माहुरे

राळेगाव : १२/९/२०२४ रोजी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान भरदुपारी राळेगाव शहरातील महालक्ष्मी मोबाईल शाॅपी जवळ धारदार शस्त्राने हल्ला करुन एका ३० वर्षीय युवकाला गंभीर जखमी करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोराला अवघ्या आठ तासात अटक केली. सदर घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

विशाल मारोती खळसकार (वय २२) रा.झाडगाव असे आरोपीचे नाव असून जखमी तरुण योगेश उर्फ आशिष उत्तम लढी (३०) रा.झरगड असे नाव आहे. सदर घटनेतील आरोपीच्या बहीणीचे जखमी योगेश उर्फ आशिष यांच्याशी पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासुन जखमी हा त्यांच्या बहीणीला त्रास देत असल्याने घटनेतील आरोपीने राळेगाव शहरातील महालक्ष्मी मोबाईल शाॅपी जवळ जखमींच्या पोटावर, मानेवर, चाकुने हल्ला चढविला. 

घटनेची माहिती राळेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार सिताराम मेहत्रे यांना मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचले. जखमीला तातडीने ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे हलविण्यात आले असून त्याचेवर उपचार सुरू आहे. 

या प्रकरणी जखमीचा भाऊ स्वप्नील उत्तम लढी यांनी राळेगाव पोलिस स्टेशनला रिपोर्ट दिला असता त्यावरुन अ.प.क्र.३७६/ २४ कलम १०९ भा.न्याय.सहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेतील आरोपी विशाल मारोती खळसकार याला राळेगाव पोलिसांनी अवघ्या आठ तासात ताब्यात घेतले असुन, सदर घटनेचा पुढील तपास रामेश्वर वेंजणे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सिताराम मेहत्रे पोलिस निरीक्षक राळेगाव यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विशाल बोरकर हे करीत आहे.
Previous Post Next Post