आंबेडकरी समाज हा जगाचे बौद्धिक नेतृत्व करणारा -प्रा. माधव सरकुंडे


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळअलिकडच्या काळात संविधानाचे लचके तोडण्यात येत आहेत. सामान्य माणसाचे मूलभूत अधिकार नाकारले जात आहेत. अशा अटीतटीच्या वेळी इतर सर्व लहान मोठ्या समूहांनी स्वत:ला आंबेडकरी चळवळीशी जोडून घेतले पाहिजे. जगातील सर्व धार्मिक समूह हे अवैज्ञानिक क्रियाकलापात व्यस्त असून चिकित्सेला नकार देत आहेत. बुद्ध मात्र सर्व प्रकारच्या आणि सर्व स्तरातील चिकित्सेला प्राधान्य देतो. आंबेडकरी समाज हा वैज्ञानिक जाणीवा असणारा समूह असल्याने तोच जगाचे बौद्धिक नेतृत्व करू शकतो असे प्रतिपादन प्रा. माधव सरकुंडे यांनी केले. ते 'संघर्षस्तंभ' या डॉ अशोक कांबळे गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री वसंत पुरके होते. स्थानिक एकविरा हॉटेल येथे गौरव ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विचारमंचावर चित्रकार बळी खैरे, डॉ. प्रकाश राठोड, कवी प्रशांत वंजारे, प्रा. अशोक कांबळे उपस्थित होते.

प्रा. सरकुंडे म्हणाले, आंबेडकरी चळवळीमुळे जीवनाचे मर्म समजते. जीवनाचे ध्येय समजते. उपक्रमशीलता, प्रयोगशीलता आणि वैचारिक दिशा केवळ आंबेडकरी चळवळीतूनच मिळू शकते. आदिवासी समाजाने मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर समजून घेतले पाहिजे.
प्राचार्य डॉ. अशोक पळवेकर म्हणाले, अलिकडच्या दहा वर्षांत इतिहास, समाजकारण, सांस्कृतिक वलय या गोष्टींचा अक्षरशः विपर्यास करण्यात आला असून सामान्य माणसांवर खोट्या गोष्टी लादण्यात आल्या आहेत. सर्व संविधानिक स्वायत्त संस्था सत्ताधाऱ्यांनी नियंत्रित केल्या असून या सर्व स्वायत्त संस्था सत्तेच्या बाजूने झुकल्या आहेत. त्यामुळे समकाळाची गंभीर समिक्षा करण्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री वसंत पुरके म्हणाले, मतांसाठी कुठल्याही थराला जाण्याची सत्ताधारी राजकीय लोकांची प्रवृत्ती घातक आहे. राज्यकर्ते अंधश्रद्धेचा प्रसार करून जनतेला भ्रमित करत आहेत त्यामुळे जनतेने जागृत होऊन लोकशाही वाचवली पाहिजे. 'प्रथमतः आणि अंतिमतः भारतीय असणे' हाच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा प्रखर राष्ट्रवाद प्रत्येकाने अंगात रूजवला पाहिजे. 
यावेळी प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, चित्रकार बळी खैरे, प्रशांत वंजारे, डॉ. अशोक कांबळे यांनी सुद्धा समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. युवराज मानकर यांनी,सूत्रसंचालन कवी सुनील वासनिक यांनी तर आभार युगंधरा कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला साहित्य रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
आंबेडकरी समाज हा जगाचे बौद्धिक नेतृत्व करणारा -प्रा. माधव सरकुंडे आंबेडकरी समाज हा जगाचे बौद्धिक नेतृत्व करणारा -प्रा. माधव सरकुंडे Reviewed by सह्याद्री चौफेर on April 29, 2024 Rating: 5
Powered by Blogger.