सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : यवतमाळ-वणी या रहदारीच्या राज्यमार्गांवरील एका गोडावूनच्या बाहेर झोपलेल्या चौकीदाराची हत्या करून अज्ञात दरोडेखोरांनी सलाखीचे वजनी बंडल लांबवल्याची घटना आज सोमवारला सकाळी उघडकीस आली.
मृतक हा साठ वर्षाचा असून जीवन विठ्ठल झाडे रा. आष्टोना (ता. राळेगाव) असे त्याचे नाव आहे. मात्र,चौदा हजाराच्या सलाखी साठी निष्पाप चौकीदाराची हत्या केल्याने व्यापारीवर्गात कमालीची दहशत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार वणी येथील सिमेंट व स्टीलचे व्यावसायिक योगेश ट्रेडर्सचे मालक सुरेश खिंवसरा यांचे यवतमाळ-वणी राज्यमार्गावर सिमेंट गोडावून आहे. त्या गोडाऊनची रखवाली राळेगाव तालुक्यातील आष्टोणा येथील जीवन झाडे हा व्यक्ती करित असून मागील दहा वर्षापासून खिंवसरा यांचेकडे चौकीदारीचे काम करत होता. काल रविवारीचे रात्री चौकीदार हा गोदामच्या बाहेरील ठिकाणी बाजेवर झोपला होता. दरम्यान, रात्री आलेल्या अज्ञात लोकांनी बाहेर झोपलेल्या चौकीदाराच्या डोक्यावर तसेच पाठीवर जबर हल्ला करुन त्याची हत्या करून दरोडेखोरांनी गोदामाच्या बाहेर ठेवलेले सळाखीचे 4 बंडल अंदाजे किंमत 14 हजार रुपयाचे वाहनात टाकून पोबारा केला.
आज सोमवारला सकाळी योगेश ट्रेडर्सचा दिवाणजी रोजच्या प्रमाणे गोदामावर गेला तेव्हा ही धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेबाबत त्याने तत्काळ गोदाम मालक सुरेश खिंवसरा यांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वणीचे उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी आपल्या चमू सह घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. सदर घटनेबाबत फिर्यादी सुरेश खिंवसरा यांनी ठाण्यात तक्रार नोंद करताच वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्याने घेत प्रकरण तपासात घेतले आहे.
रहदारीच्या मार्गांवर चौकीदाराची दरोडेखोरांनी केली हत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 29, 2024
Rating: