सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यातील 105 गावासाठी 33 केव्ही चे असलेले वीज उपकेंद्र छोटे पडत असून विजपुरवठा वारंवार खंडीत राहतो. त्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न तालुक्यात बिकट बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सिंचनाची होणारी गैरसोय बघता तालुक्यात 132 केव्ही उपकेंद्र मंजूर करावे अशा आशयाचे निवेदन विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस च्या वतीने देण्यात आले.
मारेगाव तालुक्यात विजेची भयावह स्थिती असल्याने शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न बिकट बनला आहे. विजेची मागणी वाढताच लोढ वाढल्याचे कारण देत दिवसभर कृषी पंपाचा वीज पुरवठा बंद असतो तर कधी दिवसाला अगदी 1ते 2 तास वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे सिंचन कसे करावे हा शेतकऱ्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत वीजवितरण विभागाला निवेदन दिल्यावर आम्ही काहीच करू शकत नाही, अशी माहिती येथील कार्यकारी अभियंता देतात. गेल्या दहा वर्षापासून तालुक्यात ही समस्या उग्र स्वरूपात आहे. सध्या तालुक्यात 33 केव्ही उच्च दाबाचे तीन उपकेंद्र कार्यरत आहे परंतू यातून तालुक्यातील विजेची मागणी पूर्ण होत नाही.
त्यामुळे तालुक्याला 132 केव्ही अती उच्च दाब उपकेंद्र मंजूर करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी तत्कालीन ऊर्जा मंत्री बावनकुळे, नितीन राऊत यांना ही निवेदन देण्यात आली होती. परंतू फक्त आश्वासने देण्यात आली. मात्र, प्रश्न सुटला नाही.
शेतकरी आत्महत्या ग्रस्त तालुका म्हणून तालुक्याची ओळख आहे. असे असताना तालुक्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. विजेचा प्रश्न मार्गी लावावी अशा आशयाचे निवेदन तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक खालिद पटेल, माजी गटनेते उदय रायपुरे, आदीसह पक्षाचे नेते उपस्थित होते.