टॉप बातम्या

मोकळ्या मैदानात अर्धनग्न अवस्थेत आढळला इसमाचा मृतदेह


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीवणी-घुग्गुस मार्गावरील वाघदरा बस थांब्याजवळील एका बियरबारच्या मागे एका इसमाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रचंड जखमा आढळून आल्याने त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्रथमदर्शनी ही खुनाची घटना असल्याचे समोर आले असून मृतकाची भाची नामे शालु राजु लक्षकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

देवराव दत्तु गुंजेकार (५६) रा. मुळगव्हाण ता.झरी जामणी जिल्हा यवतमाळ हल्ली मुक्काम नवीन लालगुडा (वणी) असे मृतक इसमाचे नाव आहे.

मृतक देवराव गुंजेकर हा गल्लीबोळात फिरून भंगार वेचण्याचं काम करायचा. तो दारूचाही प्रचंड व्यसनी असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या सोबत त्याचा परिवार नव्हता. पण त्याची भाची त्याच्यासोबत राहत होती. विशेष म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणी किरायाच्या घरात राहायचा. दोन महिन्यांपूर्वी तो वाघदरा येथून नवीन लालगुडा येथे एका किरायाच्या घरात राहायला गेला होता. सोमवारी 18 ऑगस्टला सकाळी त्याचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलांना वाघदरा स्टाप जवळील एका बियरबारच्या मागे गौरी ले आऊट येथे देवराव रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसला. नंतर ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. दरम्यान ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मृतक हा पाठमोऱ्या अवस्थेत पडला होता. पोलिसांनी त्याला सरळ केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड जखमा आढळून आल्या. त्यामुळे आपसी वादातून अज्ञात मारेकऱ्याने त्याचा दगडाने ठेऊन खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. 

मात्र, एका भंगार वेचणाऱ्याचा खून करण्याइतपत असा कोणता टोकाचा वाद झाला असावा अशी चर्चा परिसरात रंगली आहे. त्यातच विवस्त्र अवस्थेत या इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात चर्चांना उधाण आले आहे. या खून प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
Previous Post Next Post