प्रशांत चंदनखेडे | सह्याद्री चौफेर
बाजार समितीच्या माध्यमातून कास्तकारांनी धान्याची विक्री केली. बाजार समितीने स्वतः व्यापारी नेमले, व त्यांच्या मार्फत बोली लावून धान्य खरेदी केले. २४ किंवा ४८ तासांत चुकाऱ्याची रक्कम कास्तकारांच्या खात्यात जमा होणे अनिवार्य होते. पण व्यापाऱ्याने धोकेबाजी करत चुकारे न देता पळ काढला. नाममात्र सालवंशी, शेतीचा सातबारा व कोरे चेक घेऊन बाजार समितीने कोणतीही शहानिशा न करता व्यापाऱ्याला धान्य खरेदीचा परवाना दिला. व्यापाऱ्याने कास्तकारांचे कोट्यवधी रुपयांचे धान्य खरेदी करून चुकारे न देताच जमानतदारासह पळ काढला. व्यापाऱ्याची पैसे देण्याची नियत फिरली. जगाचा पोशिंदा असलेल्या कास्तकारांच्या पोटावरच या नियतखोर व्यापाऱ्याने लात मारली. बाजार समितीनेही वेळेवर चुकाऱ्याची रक्कम अदा होत नसतांनाही या व्यापाऱ्याकडे धान्य खरेदी सुरूच ठेवली. एवढेच नाही तर १५ दिवस लोटूनही धान्याची रक्कम मिळाली नसतांनाही बाजार समितीने व्यापाऱ्याला धान्याची उचल करू दिली. याला व्यापाऱ्यावर दाखविलेला अंधविश्वास म्हणावे की काय, हेच कळत नाही. कास्तकार बाजार समितीवर डोळेझाकपणे विश्वास ठेऊन पैशाच्या हमीमुळं बाजार समितीच्या माध्यमातूनच धान्याची विक्री करतात. पण आता बाजार समितीच ठगांच्या जाळ्यात अडकू लागल्याने कास्तकारांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर हा प्रश्न निर्माण झाला आहे. १४७ कास्तकारांचे १ कोटी १३ लाख रुपयांचे चुकारे थकीत होते. त्यापकी बाजार समितीने ५६ लाख रुपयांचे चुकारे काही कास्तकारांना काही दिवसांपूर्वी अदा केले. उर्वरित चुकाऱ्याची रक्कम २५ फेब्रुवारीला कास्तकारांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले होते. पण एक महिना होत आला तरी कास्तकऱ्यांच्या खात्यात चुकाऱ्याची रक्कम जमा न झाल्याने कास्तकारांचा आज संयम सुटला, व कास्तकारांनी एकजूट होऊन बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. धान्याची रक्कम तत्काळ अदा करा, नाही तर धान्य परत द्या, अशी आक्रमक भूमिका आज सभापतीच्या दालनात जमलेल्या शेतकऱ्यांनी घेतली. सभापती व सचिवांना चुकाऱ्यासाठी हतबल झालेल्या कास्तकारांनी चाललेच धारेवर धरले. कास्तकारांना तुमच्यासारखे मासिक वेतन मिळत नाही. वर्षभर राबराब राबून, आस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करून जे धान्य हातात येतं ते विकून कौटोम्बिक गरजा भागवाव्या लागतात. कास्तकारांवर आज उपासमार सहन करण्याची वेळ आली असतांनाही त्यांना धान्याचे चुकारे देण्याऐवजी बाजार समिती वेळकाढू धोरण अवलंबत आहे. त्यामुळे कास्तकारांनी बाजार समितीच्या दालनातच उपोषणाला बसण्याचा इशारा सभापती व सचिवांना दिला. ५ जानेवारी २०२२ ते ११ जानेवारी २०२२ या कालावधीत बाजार समितीचा परवानाधारक व्यापारी धीरज अमरचंद सुराणा रा. बन्सल ले-आऊट दत्त मंदिर मागे याने १४७ कास्तकारांकडून १९३५.०२ क्विंटल धान्य (सोयाबीन, चणा, तूर) खरेदी केले. ज्याची किंमत १ कोटी १३ लाख रुपये एवढी आहे. या व्यापाऱ्याचा जमानतदार रुपेश नवरतनमल कोचर रा. पद्मावती नगर हा होता. धान्याचे चुकारे न देताच व्यापाऱ्यासह जमानतदारही फरार झाला. हे दोघेही जवळपास तिने महिने होऊनही पोलिसांच्या हाती लागले नाही. दोघेही पोलिसांना गुंगारा देत आहे, व अटकपूर्व जमिनीसाठी प्रयत्न करित आहे. या व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण त्याला अटक करण्यात मात्र पोलिसांना अद्यापही यश आले नाही. सभापती म्हणतात की, जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या संपत्तीचा लिलाव करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांची संपत्ती विकून चुकारे देऊ हि भाषा आता कास्तकारांसमोर वापरली जात आहे. व्यापाऱ्याने नाममात्र सालवंशी, शेतीचा सातबारा व कोरे चेक बाजार समितीला देऊन धान्य खरेदीचा परवाना मिळविला. या व्यापाऱ्याच्या शेतीवर व घरावरही बँकेचे कर्ज असल्याची बाजार समितीतीलच काही कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा सुरु होती. मग फसवणुकीचा इरादाच असणाऱ्या व्यापाऱ्याच्या व जमतदाराच्या बँक खात्यात काय भुरका असेल असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत होता. शेतकरी तत्काळ चुकारे देण्याची मागणी करत होते. पण शेवटी एका आठवड्यात चुकारे देण्यावर तोडगा झाल्याचे समजते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांची आक्रमकता पाहून मोठा पोलिस बंदोबस्त त्याठिकाणी ठेवण्यात आला होता. तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनीही बाजार समितीमध्ये येऊन कास्तकारांच्या व्यथा समजून घेतल्या.
सपोनि शिवाजी टिपूर्णे व प्रविण हिरे यांनी कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेत कास्तकारांची समजूत काढली. पण शेवटी या महिन्यात धान्याच्या चुकाऱ्याची रक्कम न मिळाल्यास कर्ज काढलेल्या कास्तकारांना व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागेल ही व्यथा मात्र कास्तकारांमधून व्यथित होत होती.
जगाचा पोशिंदा असलेल्या कास्तकारांवरच आली आहे उपासमार सहन करण्याची वेळ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 21, 2022
Rating:
