टॉप बातम्या

राजूर कॉलरी येथील बंद पडलेल्या मिनी वॉटर फिल्टर प्लांटच्या तांत्रिक दुरुस्तीकरण्याची मागणी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (६ जुलै) : राजूर कॉलरी येथे ग्रामपंचायतेच्या पुढाकाराने लावण्यात आलेल्या सार्वजनिक मिनी वॉटर फिल्टर प्लांट कडे आता ग्रामपंचायतेचेच दुर्लक्ष झाले असून मागील काही महिन्यांपासून या वॉटर फिल्टर प्लांट मधील मशनरीज नादुरुस्त असल्याने राजूर वासियांना शुद्ध व थंड पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. या वॉटर प्लांटमध्ये वॉटर एटीएम बसविण्यात आले आहे. त्यामध्ये ५ रुपयांचा क्वाईन टाकल्यास शुद्ध व स्वच्छ पाणी गाव वासियांना मिळत असल्याने या वॉटर एटीएम ला गावकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाली. पण आता या वॉटर एटीएम मधून अस्वच्छ, दूषित व चिलायुक्त पाणी येत असल्याने राजूर वासियांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतेने या वॉटर फिल्टर प्लांटच्या मशनरीज मधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून राजूर वासियांना शुद्ध व थंड जल उपलब्ध करून देण्याची मागणी राजूर येथील नागरिकांनी ग्रामपंचायतेकडे केली आहे. राजूर कॉलरी ग्रामपंचायतेचे सरपंच व सचिव यांना दिलेल्या लेखी अर्जातून ही मागणी करण्यात आली आहे. 
राजूर कॉलरी येथील वार्ड क्रं. २ मधील साईनगरी येथे ग्रामपंचायतेच्या वतीने सार्वजनिक मिनी वॉटर फिल्टर प्लांट तयार करण्यात आला. त्याठिकाणी वॉटर एटीएम लावण्यात आले. ५ रुपयात नागरिकांना शुद्ध व थंड पाणी पिण्याकरिता मिळत असल्याने या वॉटर फिल्टर एटीएमला राजूर वासियांची चांगलीच पसंती मिळाली. राजूर ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व सदस्यांच्या पुढाकाराने राजूर वासियांकरिता हा मिनी वॉटर फिल्टर प्लांट तयार करण्यात आला. शुद्ध पाण्याच्या अभावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणूच ग्रामपंचायतेने हा सार्वजनिक वॉटर प्लांट उभारला. ५ रुपयांच्या नाममात्र दरात शुद्ध व थंड जल नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले. तत्कालीन लोकप्रतिनिधींनी हा प्लांट बंद पडणार नाही याची पुरेपूर काळजीही घेतली. पण आता या वॉटर फिल्टर प्लांटच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांपासून या मिनी वॉटर फिल्टर प्लांटच्या मशनरीज मध्ये बिघाड आला आहे. पाणी थंड करण्याची मशीन तर बंदच आहे, पाणी शुद्ध करण्याची मशीन देखील नादुरुस्त अवस्थेत आहे. एटीएम मशीनमध्येही बिघाड आला आहे. क्वाईन टाकल्यानंतरही पाणी येत नाही. मशीनला ठोकावे लागते नंतर पाणी बाहेर पडतं, ते ही अगदीच दूषित व चिलायुक्त. राजूर येथील नागरिकांना माफक दरात शुद्ध पाणी मिळावे, याकरिता ग्रामपंचायतेने निधी खर्च करून तयार केलेला मिनी वॉटर फिल्टर प्लांट आता ग्रामपंचायतेच्याच दुर्लक्षितपणामुळे कायमचा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणाचा जनहितार्थ असलेल्या सेवा सुविधांना फटका बसू नये, ही राजूर वासियांची मागणी आहे. या वॉटर फिल्टर प्लांट मधील तांत्रिक बिघाड दूर करून येथून नागरिकांना नेहमी शुद्ध पाणी उपलब्ध होईल याकडे ग्रामपंचायतेने लक्ष देण्याची मागणी राजूर येथील नागरिकांनी ग्रामपंचायत सरपंच व सचिवांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनावर नमिता अडकिने, द्वारकाबाई वाघमारे, राजेंद्र वाळके, सुशील अडकिने, दमयंती भगत, शारदा शाहू आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous Post Next Post