सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (५ जुलै) : कुणालाही न सांगता अचानक घरून निघून गेलेला इसम मृतावस्थेत आढळून आल्याची घटना आज ५ जुलैला सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर इसम आज सकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक घरून निघून गेला. त्यानंतर त्यांचा शोध घेतला असता ते मानकी रोडवर पडून असल्याचे समजले. त्यांना लगेच दुचाकीने ग्रामीण रुग्णालयात आणले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची तक्रार मृतकाच्या मुलीने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे.
वणी शहरातील भीमनगर येथे राहणारे माणिक उद्धव धांडे (५५) हे आज सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास मानकी रोडवर मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी दुसरा विवाह केल्यानंतर ते आपल्या पत्नी व मुलांसह सेवानगर येथे रहात होते. त्यांच्या दुसऱ्या पत्नीला कर्करोग झाल्याने ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. मानसिक तणावातूनच ते राहत्या घरून अचानक निघून गेले. सकाळी ५ वाजता ते घरून निघून गेल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोधाशोध सुरु केला. ते मानकी रोडवर पडून असल्याचे कळल्यानंतर त्यांना लगेच दुचाकीने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यांची मुलगी रिता माणिक धांडे (३२) रा. भीमनगर यांनी वडिलांच्या बेपत्ता व मृत्यूची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे.
पुढील तपास पोलिस करित आहे.