अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले, वडिलांची पोलिसांत तक्रार; राजूर कॉलरी येथील घटना

                        (संग्रहीत फोटो) 

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.१९) : तालुक्यातील राजूर कॉलरी येथे राहणाऱ्या मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी घरून अचानक बेपत्ता झाल्याची घटना १७ जूनला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मुलीचा सर्वत्र शोधाशोध घेतल्यानंतर मुलीच्या वडिलाने १९ जूनला सायंकाळी ५.४७ वाजता मुलगी घरून निघून गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. तसेच मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशयही मुलीच्या वडिलाने तक्रारीत व्यक्त केला आहे. 
राजूर कॉलरी येथे वास्तव्यास असलेल्या मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलगी घरून अचानक बेपत्ता झाली. आईला मोठेबाबाच्या घरी जाते म्हणून सांगून गेलेली मुलगी नंतर घरी परतलीच नाही. वडिलाने तिच्या मोठेबाबाकडे चौकशी केली असता, ती त्यांच्याकडे आलीच नसल्याचे मोठेबाबाने सांगितल्यानंतर आई वडीलांना चांगलाच धक्का बसला. त्यानंतर आई वडिलांनी तिचा नातेवाईक व परिचयातील सर्वच लोकांकडे शोध घेतला. पण ती कुठेच आढळून आली नाही. दोन दिवस आप्तस्वकीयांकडे शोध घेतल्यानंतर वडिलांनी पोलिस स्टेशनला मुलगी घरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. तसेच त्यांनी मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचाही तक्रारीत उल्लेख केला. अल्पवयीन मुलगी ही राजूर कॉलरी येथीलच एका महाविद्यालयात ११ वी चे शिक्षण घेत होती. आई वडील चुना भट्यात मजुरीचे काम करतात, तर भाऊ शहरातील एका सेलमध्ये काम करतो. १७ जूनला दुपारी २ वाजता आईला मोठेबाबाकडे जाते, असे सांगून ही मुलगी घराबाहेर पडली ती घरी परतलीच नाही. याबाबत वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भादंवि च्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. 
पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे. 



Previous Post Next Post