सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.२०) : शहर व तालुक्यात रेती तस्करी चांगलीच फोफावली असून रेती तस्करीतुन मोठा आर्थिक लाभ मिळत असल्याने अच्छा अच्छांनी तस्करीच्या या धंद्यात उड्या घेतल्या आहेत. रेती तस्कर विविध शकली लढवून रेतीची तस्करी करतांना दिसतात. काही रेती तस्कर एवढे निर्ढावले आहेत की, अधिकारी वर्गांवरच वरचढ होण्याइतपत त्यांची मजल होतांना दिसते. कार्यवाहीची धास्ती न बाळगता वदरहस्तांच्या आशीर्वादाने बिनभोबाट रेतीची तस्करी केली जाते. अशाच रेतीची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना विशेष पोलिस पथकाने अटक केली आहे. रेतीचे अवैध उत्खनन करून ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी आज १९ जूनला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अटक केली. दुचाकीने रस्त्यावर देखरेख करीत दोन इसम अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असल्याचे विशेष पोलीस पथकाच्या निदर्शास आल्याने पोलिसांनी चारगाव चौकी ते घुग्गुस रोडवर ट्रॅक्टर अडवून चालकासह दुचाकीवरील दोन इसमांना अटक केली. शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पुनवट येथे अवैध रेतीचे उत्खनन सुरु असल्याची विशेष पोलिस पथकाला माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी चारगाव चौकी ते घुग्गुस रोडवर गस्त घातली असता दोन इसम दुचाकीने आपल्या देखरेखीत अवैधरित्या ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस पथकाने ट्रॅक्टर अडवून रेतीची तस्करी करणाऱ्या दोन तस्करांना ताब्यात घेतले. तसेच ट्रॅक्टरसह चालकाला पुढील कार्यवाही करिता शिरपूर पोलिसांच्या स्वाधीन केले. विशेष पोलिस पथकाने या धाडीत एक ट्रॅक्टर रेती किंमत ६ हजार रुपये, ट्रॅक्टर किंमत ५ लाख रुपये, दुचाकी किंमत ४० हजार रुपये, तीन मोबाईल किंमत २१ हजार रुपये असा एकूण ५ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन रेती तस्कर व एक ट्रॅक्टर चालक अशा तीनही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाहीकरिता प्रकरण शिरपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलीस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, विशेष पोलिस पथकाचे राजू बागेश्वर, जितेश पानघाटे, मुकेश कारपते, मिथुन राऊत, निलेश भुसे, अजय वाभीटकर, शासकीय वाहन चालक महेश यांनी केली.