सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
वणी : रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता, समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या महिलांनी राबविला. वणी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून महिलांनी रक्षाबंधन साजरे केले.
सण-उत्सवाच्या काळातही स्वतःचे घरदार, कुटुंब बाजूला ठेवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस बांधवांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. महिलांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून औक्षण केले. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ भावनिक आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
राखी स्वीकारताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहण्याचा विश्वास व्यक्त केला. पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या उपक्रमामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस बांधवांनाही रक्षाबंधनाच्या निमित्ताने काही क्षणांचा कौटुंबिक आनंद अनुभवता आला. तसेच पोलीस आणि समाज यांच्यातील स्नेह, आपुलकी व सामुदायिक सलोखा वाढविणारा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. मानवी हक्क सुरक्षा परिषद यवतमाळ जिल्हा महिला अध्यक्ष सौ. सुमित्रा गोडे, जिल्हा उपाध्यक्ष सौ. मनीषा निब्रड, तालुका अध्यक्ष सौ. सुनिता काळे, वणी शहर अध्यक्ष सौ. प्रेमिला चौधरी, ग्राहक पंचायत उपाध्यक्ष सौ. संध्या रामगीरवार तसेच सुतार समाज महिला अध्यक्ष सौ. मंगलाताई झिलपे यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधली.


