सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी विधानसभा क्षेत्रात अवैध दारूचा व्यवसाय दिवसेंदिवस बोकाळत असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निष्क्रियतेमुळे दारू माफियांचे फावले असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाचे वणी विधानसभा अध्यक्ष सतीश देरकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन सादर करून तातडीने धडक कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावांमध्ये राजरोसपणे अवैध दारूची विक्री सुरू असून युवकांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. गावागावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असताना संबंधित यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
सतीश देरकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, अवैध दारू विक्रेत्यांवर तातडीने धाडी टाकून गुन्हे दाखल करावेत, त्यांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारावी. अन्यथा प्रहारच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
वणी परिसरात अवैध दारूचा वाढता सुळसुळाट हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचाच नव्हे, तर सामाजिक आरोग्याचाही गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग आता कागदोपत्री कारवाईत वेळ घालवणार की प्रत्यक्ष मैदानात उतरून दारू माफियांना चाप लावणार? असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
निवेदन देताना विधानसभा अध्यक्ष सतीश देरकर यांच्यासह रघुवीर कारेकर प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष, धनराज भलामे, रशीद शेख,तबरेज सिद्दीकी मंगेश मडावी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.