सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : पोलिसांबद्दल समाजात विश्वास निर्माण करणारी एक सकारात्मक घटना वणी येथे घडली आहे. वणी बस स्थानक परिसरात हरवलेली रोख रक्कम व महत्त्वाच्या कागदपत्रांनी भरलेली हँडबॅग वणी पोलिसांनी प्रामाणिकपणे शोधून संबंधित महिलेला परत सुपूर्द केली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणा तालुक्यातील टाकडघाट येथील पूजा वीरू राऊत या शनिवारी दुपारी वणी बस स्थानकावर आल्या होत्या. गडबडीत त्यांची हँडबॅग बस स्थानक परिसरातच हरवली. बॅगमध्ये रोख रक्कम तसेच महत्त्वाची कागदपत्रे असल्याने त्यांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र बॅग मिळून आली नाही.
दरम्यान, कर्तव्यावर असलेले वणी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रितेश यांना ही बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. त्यांनी तत्काळ बॅगची तपासणी करून वरिष्ठांना माहिती दिली व बॅगेच्या मालकाचा शोध सुरू केला. काही वेळातच पूजा राऊत यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
योग्य ती खातरजमा केल्यानंतर पोलीस शिपाई रितेश यांनी सदर बॅग पूजा राऊत यांच्या स्वाधीन केली. हरवलेली बॅग व त्यातील कष्टाचे पैसे सुरक्षित परत मिळाल्याने पूजा राऊत यांनी वणी पोलिसांचे आभार मानले.
या घटनेमुळे वणी पोलिसांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलिसांबद्दल नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.