टॉप बातम्या

सर्वसामान्य माणसांप्रती असलेली आत्मीयता ही संजय खाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख


सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी विधानसभा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून शांतपणे, सातत्याने आणि निस्वार्थ भावनेतून समाजकारण करणारे काँग्रेसचे युवा नेतृत्व म्हणजे संजय खाडे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरामुळे परिसरात सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी संदेश दिला जात आहे. वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या सेवाभावी वृत्तीची प्रचिती दिली आहे.

साधी राहणी, मनमिळावू स्वभाव आणि सर्वसामान्य माणसांप्रती असलेली आत्मीयता ही संजय खाडे यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख मानली जाते. राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी कधीही दिखाऊपणाचा मार्ग स्वीकारला नाही. उलट जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर निष्ठा ठेवून त्यांनी अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य केले आहे. पक्षाचे एक निष्ठावंत, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांशी सतत जोडलेले नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वणी, मारेगाव आणि झरी या तिन्ही तालुक्यात त्यांनी जनसंपर्काचा मजबूत पाया उभा केला आहे. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत त्यांच्या कार्याची छाप स्पष्टपणे दिसून येते.

सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक तसेच सार्वजनिक उपक्रमांमध्ये संजय खाडे नेहमी अग्रेसर राहिले आहेत. गरजूंना मदत करणे, युवकांना प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र उभारणे, सामाजिक ऐक्य जपणारे कार्यक्रम आयोजित करणे अशा अनेक उपक्रमांतून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. “सेवा हीच खरी भक्ती” हा विचार त्यांनी आपल्या कृतीतून जपला आहे.

यावर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर हे केवळ एक सामाजिक आयोजन नसून “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारा उपक्रम ठरत आहे. अनेक युवक, कार्यकर्ते आणि नागरिक या शिबिरात सहभागी होणार असून गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.

आजच्या स्वार्थी वातावरणात स्वतःची प्रसिद्धी न करता शांतपणे समाजासाठी झटणारी माणसे दुर्मिळ होत चालली आहेत. अशा काळात काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव संजय खाडे यांच्यासारखे सेवाभावी व्यक्तिमत्त्व युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस पदाधिकारी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून असेच समाजहिताचे कार्य सतत घडत राहावे, अशा शुभेच्छा व्यक्त करत आहेत.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();