सह्याद्री चौफेर । वृत्तसंस्था
वणी : गेल्या अनेक वर्षा पासून नगदी पैसे देणार पीक म्हणून वणी उपविभागातील तालुक्यातील शेतकरी वर्ग सोयाबीन पीक घेत आहेत, पण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ सुरू आहे. सोयबीन काढणीच्या काळात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसात सोयाबीन भिजू नये यासाठी काढणी व मळणीची कामे सुरू आहेत. मात्र बाजार आधारभूत दराने खरेदी होत नसल्याने सोयाबीन ठेवावे की विकावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव केंद्र किंवा व्यापाऱ्यांना हमी भावाने खरेदी करण्याची सक्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दसरा, दिवाळी या मुख्य सणाच्या तोंडावर पैसे देणारे सोयाबीन पीक असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक लागवड झाली आहे. पाऊस, नैसर्गिक आपत्तीमुळे सोयाबीनचे पीक हाताशी लागेल की नाही, या बाबत साशंकता निर्माण झाली आहे. दरम्यान, यंदा केंद्र सरकारने किमान हमीभाव ४ हजार ८९२ रुपये जाहीर केला आहे. किमान हमीभावापेक्षा कोणीही कमी दराने सोयाबीन खरेदी करू नये, असा कायदा आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून बाजारपेठेत विक्रीसाठी आणले, तर हमीभाव केंद्र सुरू नसल्याने त्यांना नाइलाजाने मिळेल त्या दराने सोयाबीनची विक्री करण्याशिवाय पर्यायच राहात नाही. सध्या बाजारपेठेत क्विंटलला चार ते चार हजार २०० रुपयांपर्यंत दर दिला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हा दर हमीभावाच्या तुलनेत ४०० रुपयांनी कमी आहे. त्यामुळे मोठी आर्थिक लूट केली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सोयाबीनला योग्य भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 13, 2024
Rating: