वनरक्षक भरती दरम्यान तरुणाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : नागपूर येथील मैदानावर वनरक्षक पदाच्या भरतीसाठी गेलेल्या 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सदर तरुणाला एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती आहे.

वणी तालुक्यातील पेटूर येथील सचिन दिलीप लांबट हा तरुण वनविभागाच्या वनरक्षक पदाच्या भरतीसाठी तयारी करीत होता. तो वणीच्या शासकीय मैदानात सरावासाठी नियमित येत होता. 4 मार्च मंगळवार ला सचिन भरतीसाठी नागपुरात दाखल झाला. वनरक्षक भरतीची शारीरिक क्षमता चाचणी 5 किलोमीटर अंतर पार करत असताना अवघ्या 10 ते 15 मीटर अंतरावर सचिन अचानक पडला तो जागेवरून उठलाच नसल्याची समजते. त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला वनविभागाच्या चमूने नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सचिन ला मृत घोषित केले.

आईवडिलांचा ही अपघात
सचिन च्या घटनेची माहिती कळताच आई-वडील पेटूरहून नागपूरकडे रवाना झाले. दरम्यान, बुट्टीबोरी नजीक त्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती आहे. मात्र,या अपघातात ते किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

शासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अधुरेच
सचिन हा सामान्य कुटुंबातील तरुण होता. हलाखीच्या परिस्थितीत जगून त्याने शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. रोज वणीच्या शासकीय मैदानावर येऊन सराव करायचा. मात्र, या घटनेने सचिनचे स्वप्न मैदानावरच राहिले.