सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : तालुक्यात दुष्काळाने भयावह स्थिती निर्माण झाली असून अवकाळीने खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी अनेक भागात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीतच कपाशीच्या पऱ्हाट्या मोकळ्या झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मारेगाव तालुक्याला मागील काही वर्षांपासून लागलेले दुष्काळाचे ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला आहे. यंदाही वरुणराजाच्या वक्रदृष्टीने तालुका दुष्काळात होरपळत आहे. त्यात जेमतेम पावसावर आलेल्या सोयाबीन व कपाशीचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पावसाने थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या कपाशीसह इतर पिके हातची गेली आहेत.
ऐरवी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी सुरू असते. परंतु यंदा हंगाम लवकरच आटोपण्यावर असून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कमी पाऊस, उन्हाचा तडाखा व ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे पांढरे सोने डिसेंबरच्या अखेरीस शेतातून हद्दपार होण्याची शक्यता आहे. अनेक शेतात पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीत कापसाच्या पऱ्हाट्या संपल्याचे दिसत आहेत. यंदाच्या दुष्काळात अनेकांचे हातचे सोयाबीन पिक गेले, कापूसही हद्दपार होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. यावर्षी खरिपाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, पावसाने ऐनवेळी दगा दिला त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
शेतकऱ्यांसाठी सर्वपक्षीय नेते कधी एकवटणार?
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य तो हमीभाव भेटण्यासाठी नेते मंडळी एकत्र झटणार का? कापसाला भाव मिळवण्यासाठी सामान्य नागरिक रस्त्यावर कधी उतरणार? जबाबदार सामान्य नागरिक नेत्यावर दबाव टाकून शेतीविषयक प्रश्न सोडवून घेतील का?
मात्र, सद्यस्थिती पाहता कोणीकोणाचे वाली नसल्याचे चित्र दिसतेय. परिणामी येत्या आगामी (2024) निवडणुकीत आपलिया आपण करावी सोडवण...
दोन वेचण्यातच कपाशीच्या पऱ्हाट्या मोकळ्या?
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 27, 2023
Rating: