भगतसिंग यांच्या विचारांची गरज...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

भारतामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड नंतर बारा वर्षाचा एक मुलगा, खेळण्या आणि पळण्याच्या वयात जालियनवाला बागेत जाऊन हुतात्मा वंदन करतो. हाच मुलगा वयाच्या 17 व्या वर्षी बलवंत नावाने एका प्रेस मध्ये अन्यायाविरुद्ध लेख लिहीत असतो. आई जेव्हा याच्या लग्नाचा हट्ट धरते, तेव्हा आईला उत्तर देतो. 'माझे जीवन मी उच्च आदर्शासाठी समर्पित केले आहे. पारतंत्र्य भारतामध्ये माझे लग्न झाले, तर मृत्यू हीच माझी विधवा असेल' तेच भगतसिंग वयाच्या 23 व्या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळावे, समाजवादी व्यवस्था निर्माण व्हावी हे स्वप्न उराशी घेऊन आपल्या प्राणाचे बलिदान दिले. कुठून आली ही ताकद? काय विचार होते भगत सिंग यांचे ? कोणती व्यवस्था उभी करायची होती ? असे अनेक प्रश्न आजही आपल्याला पडतात.

आपल्या प्राणाचे बलिदान देऊन कित्येक क्रांतीकारकांनी भारताची ही भूमी पावन केली. त्याचा एक मोठा इतिहास आहे. त्या गौरवशाली इतिहासाची जाण भगतसिंग यांना होती. अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढणाऱ्या क्रांतिकारकाचे विचार भगतसिंग सोबत होते. भगतसिंग सांगतात "आम्ही गुरुगोविंद सिंग, शिवाजी महाराज, रियाजखान, गैरीबाल्डी, केमाल पाशा, वॉशिंग्टन, लाफहायते, लेनिन आम्ही यांच्यापासून आदर्श घेऊन त्यांच्या पाऊलखुणांवर पाऊल ठेवित लढत आहोत. यावरून आपल्याला दिसेल की भगतसिंग यांना अन्याय व शोषणाविरुद्ध लढण्याची ताकद या विचारातून मिळत होती .आज भगतसिंग यांचे बलिदान व शौर्य याला अनन्य साधारण महत्त्व आहे तरी त्यांची महानता ही त्यांच्या आदर्शवादी विचारत दडलेले दिसते .त्यांना अपेक्षित असणाऱ्या समाज व्यवस्थेत दिसते.या आदर्श उद्दिष्ट साठी भगतसिंग याची बलिदान दिले. भगतसिंग लिहितात,"देशात अमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे .ज्यांना ही गोष्ट उमजली आहे. त्यांचे कर्तव्य आहे. त्यांनी समाजवादी सिद्धांतावर समाजाची पुनर्रचना करावी,जो पर्यंत असे केले जाणार नाही. तो पर्यंत माणसाचे माणसाकडून होणारे शोषण थांबले जाणार नाही व मानवतेची यातनेतून सुटका होणार नाही. माझ्या रक्ताच्या थेंबातून युवक पेटून उठेल त्यातून राजकीय क्रांती होईल समाजवादी आधारावर समाजाची पुनर्रचना होईल." ज्यामध्ये श्रीमंती-गरिबीचा फरक राहणार नाही. विषमता राहणार नाही. शोषण विरहित समाज निर्माण करता येईल . स्वातंत्र्यासोबतच भगतसिंग यांना या पद्धतीने समाजाची उभारणी करायची होती. आणि त्यांना युवकांकडून अपेक्षा आहे. भगतसिंग युवकांच्या संदर्भाने लिहितात. ते आजही किती प्रासंगिक आहे बघा. "नवयुवक देशाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांची बुद्धी पंगू बनवण्याचे प्रयत्न चालू आहे .भविष्यात त्याचे काय परिणाम होतील. आपण समजून घेणे गरजेचे, विद्यार्थ्यांचे मुख्य काम शिक्षण घेणे आहे. पण देशाच्या सद्यस्थितीचे ज्ञान आणि ती सुधारण्याचे उपाय विचार करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रशिक्षणात समावेश असू नये का ? स्वागत करणे, हार तुरे देणे, भाषण ऐकणे म्हणजे व्यवहारिक राजकारण काय? तर मग आपल्यावर जो अन्याय करत आहे.व्हाईसरॉय व कमिशन यांचे स्वागत करणाऱ्याला काय म्हणायचे . राजकारणाची ही दुसरी बाजू नाही का? सरकार आणि देशाच्या व्यवस्थेची निगडित कोणती गोष्ट राजकारणाच्या आखाड्यातील गोष्ट मानली जात असेल राजकारणाची दुसरी बाजू नाही का ? विद्यार्थ्यांना जन्मापासून खुश-मस्करी करण्याचा धडा शिकवला जायला पाहिजे का ? आज भारताला देश सेवकांची गरज आहे .जे तन मन धनाने देशासाठी लढतील. युवक हाच देशाचे परिस्थिती बदलू शकतो व उद्याचे भविष्य घडवू शकतो.

"जगाच्या इतिहासाचे पाणी उघडून पहा युवकांच्या रक्ताने लिहिलेले संदेश तुम्हाला पानो पाणी दिसेल, जगाच्या क्रांत्या व परिवर्तनाची वर्णने बघा त्यात तुम्हाला असेच युवक भेटतील" आजची परिस्थिती काय ? भगतसिंगाला अपेक्षित असणारा युवक दिसतो का ? आज आपल्याला व्हाट्सअप यूनिवर्सिटी वरून नॉलेज घेत त्याचा प्रचार करताना दिसतो. देशाचा व आपलं हीत काय, आपली समस्या कोणती हे न ओळखता भिडच्या प्रचाराला बळी पडत,बिन पगारी फुल अधिकारी म्हणून कार्य करताना दिसतो. राजकारणाच्या नावावर प्रस्थापितांना शुभेच्छा देताना व स्वागत करताना आढळतो आणि ज्यांना वैचारिक जाण आहे ते आपल्या आयुष्याच्या चौकटीत खुश आहे. यांचा समाज आणि देशाशी संबंध नाही. ही आज वास्तविकता आहे, तरी सुद्धा आजही भगतसिंगांचे विचार मांडणारे युवक जिवंत आहेत. जे भगतसिंगाच्या स्वप्नातील समाज निर्माण करण्यासाठी झटत आहेत. अन्याय विरुद्ध लढत आहेत. स्वतः आणि समाजाची जाण जिवंत ठेवून कोणत्याही स्तरावर असतील तरी आपल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रात समाज हिताच्या दृष्टीने योगदान देत आहेत. म्हणून हा समाज आज जिवंत आहेत. 
भगतसिंह यांच्या स्वप्नातील समाज व्यवस्था (समाजवादी) तर दूरच उलट बेरोजगारी गगनाला भिडली. महागाई वाढली, युवा बेरोजगार आहे . शेतकरी कामगार त्रस्त झाले. मोजक्या लोकांच्या हातात अमाप संपत्ती जमा होवून राहिली .अमीरी आणि गरिबीची दरी वाढली . प्रत्येक सरकारी क्षेत्रात खाजगीकरण मोठ्या प्रमाणावर चालू झाले. शोषण व्यवस्थेचे खांब दिवसेंदिवस मजबूत होऊन राहिले. यामध्ये सामान्यांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण मिळणं कठीण झालाय. भगतसिंग यांच्या समाजवादी व्यवस्थेच्या विरोधात भांडवली व्यवस्था उभी ठाकली. आता बदल कसा शक्य आहे ? कोण पुढे येणार ? जेव्हा जेव्हा विदारक परिस्थिती आली तेव्हा युवकांनी च पुढे पाऊल टाकीत समाज परिवर्तन केल्याचे उदारणे आहे. म्हणून भगतसिंग यांना युवकांकडून अपेक्षा आहे संविधानाच्या चौकटीत राहून भगतसिंग यांच्या स्वप्नातील समाजवादी व्यवस्था आणण्यासाठी संघर्ष करणे आता अपरिहार्य झाले. समाज परिवर्तनाचा समान कार्यक्रम ठरून संघर्ष करावा लागेल.

भगतसिंग याच धगधगत जीवन आम्हालाही लढण्याची ताकद देऊन जात. समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करीत असताना, अचानक आपल्याला निराशा आली किंवा आपला मार्ग भटकत आहे. लढायचं कशासाठी ? अशी एक वेळ येते तेव्हा भगतसिंगाचे जीवन लढण्याची आणि त्यागाची प्रेरणा देत असते. भगतसिंग यांचे विचार आणि प्रेरणा सदैव आपल्या आयुष्यात चिरकाल टिकून राहावेत .

भगतसिंग तू झिंदा है, हर एक लहू के कतरे मे....
याद है भगता तेरी आंधी, आग लगी है सिनेमे...

 - संदीप गोहोकार
मो: 7350006276
भगतसिंग यांच्या विचारांची गरज... भगतसिंग यांच्या विचारांची गरज... Reviewed by सह्याद्री चौफेर on September 28, 2023 Rating: 5
Powered by Blogger.