यांची प्रेरणा आणि मित्रांची मदत त्यामुळे परिषदेसाठी वणी ते बाली (इंडोनेशिया) जाण्याचे ठरले - संदीप गोहोकार
सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
भारतीय संस्कृतीच खरं तत्वज्ञान मानवी मूल्यांच्या आधारे उभ आहे. आपण विश्वबंधुत्वाची संकल्पना दिली. जगाला सर्वात आधी शांतीची,अहिंसा, मानवी मूल्याची ओळख करून देणारे गौतम बुद्ध होते. तक्षशिला, नालंदासारखे विश्वविद्यापीठ भारतात होती. ज्यामध्ये जगातील लोक शिक्षणाकरिता यायचे, युन संग, फहयान, मेगास्थेस, सारखे प्रवासी आले आणि त्यांनी कित्येक धार्मिक, राजकीय सामाजिक, संकल्पनांच अन्वेषण व विश्लेषण केले व जगाला माहिती करून दिली. पण आता तो काळ गेला. आता जगात निर्माण होत असलेल्या नवनवीन संकल्पना, नवनवीन बदल समजून घेण्यासाठी व अनुभवण्यासाठी आपल्याला बाहेर जाव लागेल, प्रवास करावा लागेल आणि मग त्यातून आपण आपल्या समाजासाठी बदल घडऊ शकतो का हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाच आहे.
युनिव्हर्सल युथ मुव्हमेंट द्वारा आयोजित ....
युनिव्हर्सल युथ लीडरशिप समिटला, विदेशात जाण्याची माझी पहिली वेळ होती. त्यामुळे माझ्या मनात भरपुर प्रश्न होते. एवढ्या देशातील लोक येणार! भाषेचा फरक पडेल? कशी असेल ती परिषद ? कसा असेल तो इंडोनेशिया देश ? पण माझ्या डोळ्यासमोर प्रेरणा होती, स्वामी विवेकानंदांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व अण्णाभाऊ साठे यांची, स्वामी विवेकानंद शिकागोला परिषदेमध्ये जाऊन आपले विचार मांडून जगाला अचंबित करून आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंचितांचे, शोषितांचे प्रश्न घेऊन गोलमेज परिषदेला गेले. अण्णाभाऊ साठे साम्यवादी व्यवस्था समजण्यासाठी रशियाला गेले. याची प्रेरणा आणि मित्रांची मदत त्यामुळे परिषदेसाठी वणी ते बाली (इंडोनेशिया) जाण्याचे ठरले.
युनिव्हर्सल युथ लीडरशिप समिट बाली इंडोनेशिया 2023 अशा परिषद कश्या साठी असतात ? काय फ़ायदा असतो ? कोणाला जाता येते ? स्कॉलरशिप कशी मिळते ? वेगवेगळ्या विषयाला धरून जागतिक परिषदा आयोजित केल्या जातात. महत्त्वाचे म्हणजे या परिषदेमध्ये जागतिक समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न होतो. नेतृत्व करणारा युवकांचा शोध, बदल घडवून पाहणाऱ्या नैतिक मूल्य जपणाऱ्या युवकांचा शोध घेणे, सांस्कृतिक देवाण-घेवाण करणे. जागतिक संघटन निर्माण करणे या उद्दिष्टपूर्ती करिता परिषद घेतल्या जाते. वेगवेगळ्या स्तरावरील सहभागी युवकांना स्कॉलरशिप दिल्या जाते.खर्च दिल्या जाते. परिषदेच्या विषयाशी निगडित सामाजिक कार्य व व्हिजन असणाऱ्या युवकाची आयोजन निवड करतात. ही परिषद सोशल इंक्युजन, क्वालिटी एज्युकेशन, चाइल्ड लेबर, या विषयाला धरून होती. या मध्ये मी क्वालिटी एज्युकेशन आणि अन एम्प्लॉयमेंट यावर माहिती व कार्य सादर केलं होत त्यातूनच माझी निवड करण्यात आली. अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयावर कार्य करणाऱ्या 50 तें 60 देशातील जवळ जवळ 60 युवक उपस्थित होते. ही परिषद 1 जून ते 4 जून या मध्ये इंडोनेशियातील बाली येथे असून या चार दिवसात डेलिगेट प्रेझेंटेशन, ऍक्टिव्हिटी, गेस्ट लेक्चर, कल्चरल प्रोग्राम अशा पद्धतीने कार्यक्रमाची आखणी होती.
1 जूनला परिषद सुरू झाली. सर्वात आधी सर्व देशातून आलेल्या डेलिगेट सोबत भेटी झाल्या .आयोजकांनी युनिव्हर्सल युथ लीडरशिप मुवमेंट व परिषदेची माहिती दिली. ही संघटना जगभर कार्य करते. दरवर्षी वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या विषयावर परिषदा आयोजित केल्या जाते. सोबतच युवकांना जागृत करणे व नेतृत्व करणाऱ्या युवकांना प्रशिक्षण देण्याच कार्य सुद्धा चालते. या समेट मधून निष्कर्षित झालेल्या उपायोजना एका रिसर्च पेपरच्या माध्यमातून युनायटेड नेशनला दिल्या जाणार आहे,असे सांगण्यात आले. गेस्ट लेक्चर मध्ये सांगण्यात आलं की, नेता कसा असावा ? नेत्याच्या मागे किती लोक आहेत त्यापेक्षाही नेत्यात समाजात बदल घडवण्याची क्षमता असावी जो बदल आनण्यासाठी लढत असतो. त्याचे कडे विजन असते.
त्यानंतर सर्वांचा परिचय व भेटी झाल्या वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या विषयावर कार्य करणाऱ्या युवकांना भेटता आले. त्याचे कार्य, संस्कृती, सामाजिक व राजकीय व्यवस्था समजण्याकरिता मदत झाली. सोबतच मी कोणत्या देशातून आलो व कोणत्या परिस्थितीतून आलो आहे सुद्धा सांगितले. आयोजकांमध्ये राईड नावाचे सर होते. ते इंग्लंड वरून आलेले त्यांची चाईल्ड लेबर वर मोठी रिसर्च चालली होती. अलेक्सीया नावाची मुलगी होती जी फ्रान्समधून आलेली जागतिक पातळीवरील एनजीओ मध्ये ते काम करते. ती कामानिमित्त जवळजवळ संपूर्ण जग फिरलेली. सौदी अरेबिया चा अहमद नवाचा मुलगा होता, जेमतेम 23 वर्षाचा तो कतार मध्ये झालेल्या फुटबॉल वर्ल्ड कप च्या मॅनेजमेंट टीम मध्ये होता. बांगलादेशचा फहिम नावाचा एक मुलगा जो खूप हुशार होता व त्याचे पॉईंट क्लियर होते तो स्वतः परिषद आयोजित करण्याच्या विचारात होता. व्हिएतनाम ची मुलगी होती तिने तिच्या देशातील क्रांतिकारक हो चीन मीन व साम्यवादी व्यवस्थेबद्दल सांगितलं. जगण्यासाठी अनुकूल अशी व्यवस्था आहे अशी ती सांगत होती. पुन्हा एक मुलगी होती तिच्या देशामध्ये नॉन कॉपोरेशन मुव्हमेंट चालू आहे. अचानक महात्मा गांधीजींची आठवण झाली. अभिमान वाटला की गांधीजींच्या विचारांना मानणारे लोक जगभर आहेत. उसबेगिस्तान, किरकिस्तान, मलेशिया, मंगोलिया, पाकिस्तान कित्येक देशातील युवक उपस्थित होते. आम्ही भारतातून पाच सहा लोक होतो. महाराष्ट्रातून फक्त दोघे पुण्याची एक मुलगी आणि ग्रामीण भागातून येणारा संपूर्ण परिषदेत मी एकटाच.
मी आपले विचार मांडताना सांगितले, "नमस्कार गुड मॉर्निंग माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, मी त्या देशातून येतो ज्या देशांनी विश्वबंधुत्वाची संकल्पना जगाला दिली. मी त्या देशातून येतो जिथे गौतम बुद्ध, स्वामी विवेकानंद महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुष होऊन गेलेत. मी त्या भारतातून आलो ज्या भारतीय संस्कृतीचा इंडोनेशियाच्या संस्कृतीवर प्रभाव आहे. मी भारतातील महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्हा वणी या छोट्याशा ठिकाणावरून एक सामाजिक विषय घेऊन आलो.
शिक्षण हे मोफत असावं, शिक्षणातून आंतरिक व बाह्य, मानसिक व बौद्धिक दोन्ही विकास व्हावा, असे शिक्षण असावे. कौशल्यावर आधारित,सामाजिक भान,नैतिकता मानवी मूल्य शिक्षण असावं. सोबतच बेरोजगारीची ही समस्या महत्वाची आहे ती आपल्याला दूर करावी लागेल कारण जगण्याचा संघर्ष जेवढा मोठा राहील तेवढा शिक्षणाचा, मानवी मूल्याचा, ऱ्हास होत जाईल. या विषयावर सविस्तर मांडणी केली. पुढे चाईल्ड लेबर वर बोलताना सांगितलं चाइल्ड लेबर या समस्येची निर्मिती आर्थिक अस्थिरतेतून, सामाजिक विषमतेतून झाली आहे. शैक्षणिक जागृती व आर्थिक स्थिरता हे त्याचे महत्त्वाचे दोन उपाय आहेत. हे काल्पनिक नाही तर सोवियत युनियन मध्ये चाईल्ड लेबर ही समस्या नष्ट झाली होती ते कशी करता येईल यावर विश्लेषण केलं."
या परिषदेच्या माध्यमातून खूप काही नवीन गोष्टी शिकता आल्या.परीषद कशा असतात. सामाजिक कार्य कशा पद्धतीने केलं पाहिजे. सोबत समस्या सांगता आल्या. आपली समस्या पण लोकल ते ग्लोबल बनवू शकतो. इतर देशातील सामाजिक परिस्थिती, संस्कृती,राजकीय व्यवस्था, समजून घेता आली. जगात कार्य करणाऱ्या युवकाशी मैत्री पूर्ण संबंध प्रस्थापित झाले. जागतिक संघटनेचा भाग बनू शकलो खूप नवीन गोष्टी अनुभवता आल्या काही थोडं फार आपलं योगदान ही देता आलं. आपल्या कार्याचा तुलनात्मक विचार करता आपल्याकडील युवकांमध्ये नक्कीच जास्त क्षमता आहे, सोबत कार्य सुद्धा आहे, असे माझ्या लक्षात आले. फक्त संधी मिळत नाही. आपल्या भागातील युवक परिषदांना, वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षणासाठी जाऊ शकतात यांची मला खात्री आहे. आपण स्कॉलरशिप सुद्धा मिळवू शकतो. म्हणून उच्च शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी या विषयावर पुढे काम करणार आहोत. आपल्याला अडचणी येतात त्या भाषेच्या, आर्थिकतेच्या पण तरी त्या तेवढया मोठ्या कधीच नसते जेवढया आपण समजतो. माझ्यासाठी ही विदेशात जाण्याची व परिषदेला जाण्याची पहिलीच वेळ होती. मी या परिषदेला जाणार नव्हतो. सामाजिक विषय घेऊन परिषदेला जाणं माझ्यासाठी सोपहीं नव्हतं. माझ्यासमोरही भरपूर अडचणी होत्या पण यात मला सर्व महत्त्वाचे मार्गदर्शन केलं दिपक दादा चटप यांनी, परिषदला जाण्यासाठी प्रेरित केलं जयसिंग पाटील गोहोकार माझे सर,विजयजी रामटेके सर, डॉ दुमोरे सर, कपिल राऊत सर, राजकीय सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याचा ज्यांना दीर्घ अनुभव आहे प्रवीण भाऊ रोगे, अजय भाऊ धोबे, प्रवीण भाऊ खानझोडे, यांनी मार्मिक बाबी सुचवल्या. आणि सर्वात जास्त मदत केली ते माझ्या मित्रांनी माझे दोन्ही भाऊ स्वप्निल दादा, राहुल खारकर, रुपेश ठाकरे, धिरज भोयर, नितीन तुरानकर, आकाश मत्ते, शुभम गावंडे, अक्षय कवरासे, सुजित गाताडे या सर्वाची लाभली.
-संदीप गोहोकार
शिक्षक तथा उपाध्यक्ष आदर्श नागरी सहकारी पतसंस्था , वणी
यांची प्रेरणा आणि मित्रांची मदत त्यामुळे परिषदेसाठी वणी ते बाली (इंडोनेशिया) जाण्याचे ठरले - संदीप गोहोकार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 13, 2023
Rating:
