सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : या देशात महान क्रांतिकारकांचे शिरोमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा वारंवार होत असलेला अपमानाचा प्रखर विरोध करण्यासाठी व स्वातंत्र्यवीराचा गौरव करण्यासाठी दि. ५ एप्रिलला वणी शहरात स्वा. सावरकर गौरव यात्रेचे आयोजन लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.
वणी विधानसभा मतदार संघातील साधू, संत, हभप मंडळी, सर्वसमाजातील सामाजिक संघटना, संस्था व्यावसायिक व विविध संघटनांच्या सहभागाने दि. ५ एप्रिल ला सायंकाळी ५ वाजता पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावरून "होय मी सावरकर" अशी टोपी घालून या गौरव यात्रेची सुरुवात होणार आहे.
या गौरव यात्रेत स्वा. सावरकरांच्या सन्मानार्थ ही यात्रा पाण्याच्या टाकीपासून निघणार असून टिळक चौक, संभाजी चौक, गांधी चौक, भगतसिंग चौक, स्वा. सावरकर चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक ते टिळक चौकात येऊन या गौरव यात्रेचा समारोप होणार आहे. समारोपानंतर रात्री ८ वाजता गाढे अभ्यासक दयाशंकर तिवारी यांचे स्व. सावरकर यांच्या जिवन चरित्रावर मार्गदर्शन लाभणार आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व सावरकर प्रेमींनी या स्वा. सावरकर गौरव यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन येथील शासकीय विश्रामगृहात आज १ एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार बोदकुरवार यांनी केले.
या पत्रकार परिषदेला आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे, भाजपाचे जिल्हा महामंत्री रवि बेलूरकर, भाजपा नेते विजय पिदुरकर, माजी जि. प. सदस्य बंडु चांदेकर, तालुकाध्यक्ष गजानन विधाते, संतोष डंभारे, संदीप बेसरकर, अभिजित ठाकुरवार हे उपस्थित होते.