वंचितच्या जम्बो कार्यकारिणीतील २० जणांनी दिले आपल्या सदस्यत्वाचे सामूहिक राजीनामे

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१५ जुलै) : वंचित बहुजन आघाडीची वणी तालुका कार्यकारणी नुकतीच गठीत करून वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी ती जाहीर केली. तालुक्याची जम्बो कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर काही दिवसांतच या जम्बो कार्यकारिणीतील २० पदाधिकारी व सदस्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची खळबळजनक माहिती हाती आली आहे. या अनपेक्षित राजीनाम्यांमुळे वंचितच्या एका सक्रिय गटातील नाराजी सर्वसृत झाली आहे.

कार्यकारणी निवडीकरिता वंचितच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत शहरात दोन वेगवेगळ्या सभा झाल्या होत्या. एका नाराज गटाने जिल्हाध्यक्षांसमोर वंचितच्या स्थानिक नेतृत्वाबद्दल नाराजीचा पाढा वाचला होता. त्यानंतर समतोल कार्यकारणी निवडीचा तिढा निर्माण झाला होता. जिल्हाध्यक्षांनी नाराजांना कार्यकारणीत काही महत्वाची पदे देऊन नाराजीवर पांघरून घालण्याचा सर्वोतपरी प्रयत्न केला. पण तालुक्याच्या नेतृत्वाचा तिढा कायम राहिल्याने अनेक वर्षांपासून वंचितच्या मुख्य नेतृत्वाला मानणारा मोठा वर्ग नाराज झाला. वंचितला जुळून असलेल्या या मोठ्या वर्गाने आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्याकडे पाठविले आहे. 

वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणी घोषित झाल्यानंतर वंचितशी जुळलेल्या निष्ठावंतांना तालुका व शहर कार्यकारणी निवडीचे वेध लागले होते. वंचितच्या जिल्हाध्यक्षांनी वंचितच्या तालुका व शहर कार्यकारिणीची निवड करण्याकरिता जिल्हा उपाध्यक्षांच्या नेतृत्वात शहरात सभा घेतली. ही सभा आटपत नाही तोच जिल्हाध्यक्षांच्याच उपस्थितीत वंचितच्या माजी पदाधिकऱ्यांचा नेतृत्वात कार्यकारणी निवडीची दुसरी सभा पार पडली. दुसरी सभा चांगलीच वादळी झाली. भारिप बहुजन महासंघापासून निष्ठेने कार्य करणाऱ्या एका मोठ्या वर्गाने स्थानिक नेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली.

सामाजिक व राजकीय कार्य करतांना किती अडचणी निर्माण केल्या जातात, याचा पाढाच त्यांनी जिल्हाध्यक्षांसमोर वाचला. यानंतरही या कार्यकर्त्यांनी वंचितशी जुडून पक्षाचे एकनिष्ठेने कार्य करण्याचे पक्षश्रेठींसमोर कबुल केले. तसेच त्यांनी वंचितच्या तालुका व शहराच्या कार्यकारणीकरिता काही महत्वपूर्ण नावे सुचविली. पण तालुका कार्यकारणी जाहीर झाल्यानंतर त्यांनी सुचविलेली नावे मुख्य प्रवाहात न आल्याने आधीच नाराज असलेला हा वर्ग आणखीच नाराज झाला. व त्यांनी कार्यकारणीत बहाल केलेल्या पदांचे राजीनामे देऊन आपली नाराजी जाहीर केली. आता हा अनेक वर्षांपासून भारिप व वंचितशी जुळेलला मोठा वर्ग आप सात कार्य करण्याची तयारी करीत आहे.

वंचितच्या तालुका कार्यकारिणीतील सदस्यत्व पदाचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये वंचितचे तालुका महासचिव प्रल्हाद चामाटे, उपाध्यक्ष सचिन वानखेडे, उपाध्यक्ष रमेश वाढई, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोहिते, उपाध्यक्ष सुमित सोनटक्के, सचिव सचिन मडावी, सहसचिव अनिल खोब्रागडे, सहसचिव गजानन गोंडे, सहसचिव प्रवीण उपरे, विधी सल्लागार ऍड. चंदू राऊत, सदस्य संतोष चिडे, महादेव बुरडकर, डॉ. मोरेश्वर देवतळे, पुखराज खैरे, शारदा मेश्राम, संगीता वानखेडे, विमलताई सातपुते, सिमा वानखेडे, वर्षा उईके, वैशाली गावंडे यांचा समावेश असून त्यांनी हे राजीनामे वंचितांच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्याकडे पाठविले आहे.
Previous Post Next Post