सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१७ जुलै) : वणी तालुक्यातील नवेगाव (विरकुंड) येथील अठरा वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल १६ जुलैला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. ममता दिनेश काकडे असे या गळफास घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. ती शहरातील एका खाजगी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.शहर व तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून मानसिक खच्चीकरणातून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. वैचारिक क्षमता लोप पाऊ लागल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जात आहे. जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन न बाळगता निराशावादी विचारसरणीतून आत्महत्येचे पाऊल उचलले जात आहे. ममता दिनेश काकडे (१८) रा. नवेगाव (विरकुंड) ही तरुणी आपल्या आई सोबत मामाकडे रहात होती. काल सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तिने घराच्या आड्याला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली.
भाचीने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच मृतीकेचे मामा माणिक झाडे यांनी पोलिस स्टेशनला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी नवेगाव येथे जाऊन घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात आणला. तरुणीने आत्महत्येचा पर्याय का निवडला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. तिच्या या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने अख्ख गाव हळहळलं आहे. पोलिस तरुणीच्या आत्महत्येचं कारण जाणून घेण्याच्या दृष्टीकोनातून तपास करीत आहेत.