सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.२१) : दारू तस्करीला आळा बसावा याकरिता दारू तस्करांवर बारीक लक्ष ठेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कार्यवाहीचा बडगा उगारला. पोलिसांनी धडक कार्यवाही करून अनेकदा त्यांचे दारू तस्करीचे प्रयत्न उधळून लावले. चोरून लपून होणारी लाखो रुपयांची दारू तस्करी उघडकीस आणली. आलिशान कार व मालवाहू वाहनातून होणाऱ्या दारू तस्करीचाही पर्दाफाश केला. चोरट्या मार्गाने लगतच्या दारूबंदी जिल्ह्यात अवैध विक्रीकरिता शहरातून जाणारी लाखो रुपयांची दारू पोलिसांनी पकडून तस्करांच्या मुसक्या आवळल्या. पण तरीही शहरात दारूचा काळाबाजार सुरूच असून अवैध दारू विक्रेते व दारू तस्कर शिरजोर होऊन दारूची तस्करी करतांना दिसत आहेत. दारु तस्करीतून अमाप पैसा मिळत असल्याने लालसेपायी अनेक जण या धंद्यात उतरले असून विविध शकली लढवून ते दारूची तस्करी करतांना दिसतात. अशाच एका दारू तस्कराला विशेष पोलिस पथकाने अटक केली आहे. ब्राह्मणी फाटा मार्गाने दुचाकीने अवैध विक्री करीता देशी दारू घेऊन जाणाऱ्या एका दारू तस्कराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या जवळून ३०० नग देशी दारूच्या शिश्यासह ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष पोलिस पथकाला ब्राह्मणी फाटा मार्गाने दारूची तस्करी सुरु असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ब्राह्मणी फाटा मार्गावर गस्त घातली असता एक जण संशयितरित्या दुचाकीने सामान घेऊन जातांना दिसला. पोलिसांनी दुचाकी थांबवून झडती घेतली असता त्याच्या जवळ देशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी त्याला नाव विचारले असता त्याने रवी महादेव दुपारे रा. पंचशील नगर असे सांगितले. विशेष पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून ३०० नग देशी दारूच्या शिश्या व दुचाकी असा एकूण ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर पुढील कार्यवाही करण्याकरिता प्रकरण वणी पोलिसांकडे वर्ग केले.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पोलिस पथक प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, पीएसआय आशिष झिमटे, पोलिस पथकाचे राजू बागेश्वर, जितेश पानघाटे, मुकेश करपते, मिथुन राऊत, निलेश भुसे, अजय वाभिटकर , वाहन चालक अजय महाजन यांनी केली.