कोरोनाचे रुग्ण झाले कमी, तालुक्यात आज आढळले केवळ ९ रुग्ण

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (ता.२ जून) : शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना संक्रमणाचा वेग अत्यंत कमी झाला असून रुग्ण आढळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याने निर्बंधही शिथिल करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानांबरोबरच इतरही दुकाने सुरु करण्यासही अनुमती देण्यात आली आहे. जवळपास दोन महिन्यानंतर संपूर्ण बाजारपेठ खुली झाल्याने व्यावसायिकांच्या व नागरिकांच्या चेहऱ्यांवर समाधान पाहायला मिळत होते. खरेदीकरिता बाजारात नागरिकांची लगबग दिसून येत होती. शहरवासीयांचा आजचा बाजारपेठेतील उत्साह पाहून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे भासत होते. इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने खुली करण्यास अनुमती मिळाल्याने दुकानदार जेवढे उत्साही होते, तेवढाच उत्साहपूर्ण प्रातिसाद नागरिकांचा सुद्धा मिळाल्याने बाजारपेठेत आज नवी नवलाई दिसून येत होती. कोरोनाची भीती बाजूला ठेऊन नागरिक निरनिराळ्या वस्तूंची खरेदी करण्यात मग्न झाले होते. आजचा नागरिकांचा बाजारपेठेतील उत्साह पाहून कोरोनाने शहरातून पळ काढल्याचे वाटत होते. शहर कोरोनामुक्त झाल्यागत दिसून येत होते. प्रशासनाने घेतलेल्या अथक प्रयत्नांमुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर नियंत्रण मिळविता आले. कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात आल्याने बाजारपेठ खुली करण्यात आली असली तरी नागरिकांनी सावधानी बाळगण्याची गरज असून प्रशासनाचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही याचे देखील नागरिकांना भान ठेवावे लागणार आहे. आज देखील तालुक्यात अतिशय कमी म्हणजे ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. तर २६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२३६ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण ७२ वर आले आहेत. 
आज १४७ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यात ७ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज करण्यात आलेल्या ११६ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचण्यांचे रिपोर्टमध्ये केवळ २ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहेत. आता केवळ ३९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. ७२ सक्रिय रुग्णांपैकी १२ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ४६ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहे. तर १४ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहे. 
आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये चिखलगाव येथील २, पुनवट २ तर गणेशपूर, उमरी, श्रीकृष्ण भवन, वासेकर ले-आऊट, मनीषनगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

Popular posts from this blog

तरुण विवाहितची गळफास घेऊन आत्महत्या,मारेगाव येथील घटना

लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता व मुदतीमुळे चिंतातूर महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

भीषण अपघातात तरुण ठार,वणी-वरोरा महामार्गवरील घटना