टॉप बातम्या

जैताई मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवाची भक्तिमय पर्वणी!

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : येथील श्री जैताई देवस्थान समितीच्या वतीने श्री जैताई शारदीय नवरात्र उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ ते २० ऑक्टोबर या कालावधीत श्री जैताई मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची भक्तिमय मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे. दररोज रात्री ८ वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याचा ‘नृत्योत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी पुणे येथील डॉ. प्रज्ञा देशपांडे यांचे कीर्तन होणार असून, बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथील मृण्मयी कुळकर्णी यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सोहम कलाविष्कार, नागपूर प्रस्तुत ‘स्वरधारा’ हा हिंदी-मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम रसिकांसाठी सादर करण्यात येणार आहे. 

शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी प्राचार्य राम शेवाळकर प्रतिष्ठान, नागपूर निर्मित दोन अंकी नाटक ‘गंमत असते नात्याची’ सादर करण्यात येणार आहे.
शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी प्राचार्य राम शेवाळकर स्मृति प्रित्यर्थ प. पू. मामा क्षिरसागर उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार प्रमुख अतिथी अविनाश सेनाड यांच्या हस्ते नारायण महादेव जवळकर, दारव्हा यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार समारंभ अध्यक्ष विद्यावाचस्पती स्वानंद पुंड असणार आहे. रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी देवीचा पारंपरिक गोंधळ आयोजित करण्यात आला असून, या माध्यमातून नवरात्रोत्सवातील पारंपरिक धार्मिक वातावरणाचा अनुभव भाविकांना घेता येणार आहे. 
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध मोफत आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये दातांचे व मूळव्याध रोगनिदान शिबिर, आयुर्वेदिक निदान व मोफत औषधोपचार, महिलांसाठी आरोग्य तपासणी, नाडीपरीक्षण तसेच डोळे व त्वचा तपासणी आदी विविध निःशुल्क आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

नवरात्रोत्सवातील सर्व धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भक्तिमय पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री जैताई देवस्थान समिती, वणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();