सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : स्व. श्री. वामन तुकाराम ठक (माजी पोलीस पाटील) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चौदाव्या कार्यक्रम स्मृतिदिनानिमित्त शुक्रवार, दि. ३१ जुलै २०२६ रोजी हटवांजरी येथे श्रद्धापूर्वक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी श्रीमद्भागवत कथाकार, राष्ट्रीय कीर्तनकार व प्रबोधनकार ह.भ.प. सुवर्णाताई प्रकाश पिंपळकर (भद्रावतीकर) यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीतामधील अध्याय २२ – "मृत्यू संस्कार" याचे प्रभावी वाचन व निरूपण केले. त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान, सत्कर्मांचे महत्त्व, मृत्यूचे अटळ सत्य आणि आदर्श जीवनमूल्ये यांवर अत्यंत हृदयस्पर्शी व विचारप्रवर्तक प्रबोधन केले. त्यांच्या ओजस्वी निरूपणामुळे उपस्थित भाविक आणि ग्रामस्थ अंतर्मुख झाले.
याप्रसंगी पांडुरंग ठक महाराज व देवराव शेंडे यांनी मनोगत व्यक्त करत स्व. वामन तुकाराम ठक यांच्या समाजाभिमुख कार्याचा, कर्तृत्वाचा आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाचा गौरवपूर्ण स्मरण केला.
कार्यक्रमादरम्यान ठक परिवारातील सदस्यांनी स्व. वामन तुकाराम ठक यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला.
या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप स्व. श्री. वामन तुकाराम ठक यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण अभिवादन करून करण्यात आला.